Rohit Sharma Old Video viral Amid Retirement Rumors: २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या योजनांमधून रोहित शर्माला वगळण्यात आल्याचा दावा करणाऱ्या अहवालांदरम्यान त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल बोलताना “मला तो वर्ल्डकप जिंकायचाय,” असं भावनिक वक्तव्य करताना दिसतो. रोहितचा हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आल्यानंतर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

विशेष म्हणजे, २०२३ च्या वनडे विश्वचषकात भारताला अंतिम फेरीपर्यंत नेल्यानंतरही विजेतेपद हुकल्याची सल रोहितने अनेकदा व्यक्त केली होती. त्यामुळे २०२७ च्या विश्वचषकात खेळून भारताला जेतेपद मिळवून देण्याची त्याची इच्छा होती. बऱ्याच जुन्या असलेल्या या व्हीडिओमध्ये रोहितसाठी तो वनडे वर्ल्डकप किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसून येत आहे. मात्र, आता त्याला २०२७ च्या विश्वचषकाच्या योजनांमधून वगळण्यात आल्याचा दावा समोर आल्याने हा व्हिडीओ पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लॉर्ड्सच्या मैदानावरील वनडे सामना रोहित शर्माच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार असल्याची बातमी समोर येताच चाहत्यांच्या सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान रोहित शर्माचा जुना व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आशिया चषक २०२३ जिंकल्यानंतर चाहते बाहेर फटाके फोडत असल्याचं ऐकताच पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणतो, अरे हे फटाके तो वर्ल्डकप जिंकल्यानंतर फोडा आणि हसतो.

पुढे रोहितचा जुना व्हीडिओ आहे द्यामध्ये तो म्हणतो आहे की, “मला फक्त तो वर्ल्डकप दिसतो, मला भाई फक्त तो वर्ल्डकप दिसतो. चेहरा नाही बस्स तो वर्ल्डकप दिसतो. ते तीन तीन छोटे पिलर आहेत आणि त्यावर पृथ्वीचा ग्लोब तयार केलेला आहे, तो दिसतो मला. मी भले त्या स्पर्धेत एक शतक करेन दोन शतकं करेन किंवा शतक करणारच नाही, पण तो वर्ल्डकप जिंकायचा आहे हेच मुख्य ध्येय आहे.” रोहित शर्माने अनेकदा वनडे विश्वचषक जिंकायचा आहे हे सांगितलं आहे. लहानपणापासून क्रिकेट पाहत आलो आहोत, तेव्हा टी-२० वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असं काही नव्हतं, होता तोच वर्ल्डकप त्यामुळे तो वर्ल्डकप मला जिंकायचा आहे. पण लॉर्ड्सवरील वनडे सामना त्याचा अखेरचा सामना असल्यास त्याचं हे मोठं स्वप्न मात्र कायमचं अधुरं राहणार.

इंग्लंडने भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेट्सने पराभव केल्याने मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे.