Rohit Sharma Virat Kohli Pair Creates History: रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडगोळीने रविवारी लॉर्ड्सवर तिसरा वनडे सामना खेळण्यासाठी उतरताच इतिहास घडवला. क्रिकेटच्या पंढरीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक सामना खेळवला जात असून या सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकली आहे. यासह इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला असून संघाने चांगली सुरूवात केली आहे आणि भारताचे गोलंदाज विकेटच्या प्रतिक्षेत आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसत आहे. इंग्लंडने या सामन्याची चांगली सुरूवात केली असून भारताच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली आहे. जसप्रीत बुमराहच्या गुडघ्याला दुखापत असल्याने तो हा सामना खेळत नाहीये. तर शिवम दुबेला बाहेर करत अर्शदीप सिंग व प्रिन्स यादव या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. यादरम्यान भारताची दिग्गज जोडी रो-को ने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे.
RO-KOच्या जोडीने क्रिकेट इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात उमटवलं
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्मा व विराट कोहली ही जोडी एकत्रितपणे ४०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारताची पहिली जोडी ठरली. याआधीच रोहित-विराट यांनी भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यांनी ३९१ सामने एकत्र खेळलेल्या सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दिग्गज जोडीचा विक्रम मोडला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने एकत्र खेळण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर असून त्यांनी ५५० सामन्यांत एकत्र मैदान गाजवलं आहे. त्यानंतर तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांनी ४२६ सामने एकत्र खेळले आहेत. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना एकत्र खेळत या मानाच्या यादीत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारतीय क्रिकेटचे दोन भक्कम आधारस्तंभ असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जवळपास एकाच काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रोहितने २००७ मध्ये, तर विराटने २००८ मध्ये टीम इंडियात प्रवेश केला. गेल्या १८ वर्षांत या दोघांनी भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळत संघाला तीन टी-२० विश्वचषक, एक वनडे विश्वचषक आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचं योगदान दिलं.
दोघांनीही आता टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या ते केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली १४,८६७ धावांसह भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा, तर रोहित शर्मा ११,७५७ धावांसह तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने एकत्र खेळलेल्या जोड्या
कुमार संगकारा / महेला जयवर्धने (श्रीलंका) – ५५० सामने
तिलकरत्ने दिलशान / महेला जयवर्धने (श्रीलंका) – ४२६ सामने
कुमार संगकारा / तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – ४१८ सामने
सनथ जयसूर्या / मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ४०८ सामने
जॅक्स कॅलिस / मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) – ४०७ सामने
रोहित शर्मा / विराट कोहली (भारत) – ४००* सामने
