भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेचा मालिकावीर ठरला. तर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीदरम्यान रोहित-विराट विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहेत.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत १५१ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या, ज्यात दोन शतकं आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे, तर रोहित शर्माने दोन अर्धशतकांसह १४६ धावा केल्या. आता हे दोन्ही दिग्गज खेळाडू नवीन वर्षात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळताना दिसतील. याआधी, दोन्ही दिग्गज २०२५-२६च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपापल्या देशांतर्गत संघांकडून खेळणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय भविष्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे, परंतु दोन्ही दिग्गजांनी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील त्यांच्या चमकदार कामगिरीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी, जर रोहित आणि कोहलीला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल, अशी चर्चा होती.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या पराभवानंतर, बीसीसीआयने केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले होते. रेव्हस्पोर्ट्सच्या अहवालानुसार, बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं आहे का, याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याला विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, विजय हजारे ट्रॉफी खेळणं हे त्यांनी (रोहित-विराट) स्वत: ठरवलं आहे, हा त्यांचा निर्णय आहे.

बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दोघेही खेळाडूंना वेळ मिळेल तेव्हा शक्य तितकं देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा आग्रह करत आहे.त यामुळे रोहित आणि कोहली रणजी ट्रॉफीमध्ये परततील अशी चर्चा सुरू होती. पण, दोघांनीही मे महिन्यात इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

काही दिवसांपूर्वी विराटने दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला विजय हजारे ट्रॉफी खेळणार असल्याचं कळवलं. डीडीएसीचे अध्यक्ष रोहन जेटली यांनीही याला दुजोरा दिला. तर रिपोर्ट्सनुसार, रोहित २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळेल.