Ricky Ponting On Virat Kohli And Rohit Sharma: आयपीएल २०२६ स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दोघेही वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. २ फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलेले हे दोन्ही खेळाडू फक्त वनडे फॉरमॅट खेळत आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहलीने २ शतकं झळकावली आहेत. तर रोहित शर्माने हॅमस्ट्रिंगचा त्रास असूनही सातत्याने धावा केल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि पंजाब किंग्स संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलं आहे.

पंजाब किंग्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी त्यांना पुढे जाताना आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहू शकतो. चॅम्पियन खेळाडूंबाबत मी नेहमीच सांगतो की, तुम्ही त्यांना कधीच नाही म्हणू शकत नाही. तुम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “या हंगामात विराट एक उत्तम उदाहरण आहे. तो आधीपेक्षा खूप कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याची विजयाची भूक अजूनही तशीच आहे. रोहित शर्मा जी फिटनेस घेऊन मैदानात उतरला आहे, तशी फिटनेस मी गेल्या १०-१२ वर्षात पाहिलेली नाही.”

विराट कोहलीने आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये ५४२ धावा केल्या आहेत. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा दुखापतीतून बाहेर आला आहे. सध्या तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये २८३ धावा केल्या आहेत. दोघांनाही वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळायची आहे. पण दोघांना या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.