पाचवेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा हंगाम सर्वात वाईट ठरला. आपल्या एकूण 14 साखळी सामन्यातील 10 सामने गमावल्यामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेच्या सर्वात तळाला रहावे लागले आहे. स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आल्याने मुंबईचे खेळाडू आता आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अद्यापही घरी गेलेला नाही. मिळालेल्या वेळेचा फायदा घेत रोहित सध्या आपली पत्नी आणि मुलीसोबत सुट्टीवर गेला आहे.

दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर रोहित शर्मा आराम करण्यासाठी मालदीवला गेला आहे. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो पत्नी रितिका सजदेहसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्यांची मुलगी समायरादेखील आहे. रोहितने रितिका आणि समायराचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रितिका जेवण करताना तर लहानगी समायरा कार्टून बघण्यात गुंतल्याचे दिसत आहे. ‘जेवण आणि चित्रपट दोन्हीही पाण्यामध्ये!’ अशा कॅप्शनसह रोहितने हा फोटो शेअर केला आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह आणखी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मिळालेल्या विश्रांतीचा रोहितने पुरेपुर वापर करत कुटुंबासह मालदीव गाठले आहे. साधारण १५ किंवा १६ जून रोजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत रोहित इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी तयारीला लागणार आहे.

आयपीएलच्या या हंगामाचा विचार केला तर, एक कर्णधार म्हणून हा हंगाम रोहितसाठी वाईट तर ठरलाच शिवाय एक खेळाडू म्हणूनही तो चांगली कामगिरी करू शकला नाही. संघाचा कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. संपूर्ण हंगामात १४ सामने खेळून त्याने १९.१४ च्या सरासरीने २६८ धावा केल्या. त्यामध्ये ४८ ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या होती.