Rohit Sharma wife cried after his Hundred: लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शानदार शतक झळकावून रोहित शर्माने निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात त्याने अवघ्या ८४ चेंडूंत शतकी मजल मारली आणि भारतीय संघातून त्याला वगळण्याबाबत तर्कवितर्क करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या कामगिरीसह, लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. रोहितचं हे शतक पाहून त्याची पत्नी रितिका सजदेहला अश्रू अनावर झाले.

वनडे मालिकेतील आधीच्या दोन्ही सामन्यांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माबाबत या सामन्यापूर्वी बरीच चर्चा आणि शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या; मात्र, ‘हिटमॅन’ने विक्रमी शतक ठोकत शानदार पुनरागमन केलं. रोहितने कोणत्या निवेदनाद्वारे नव्हे तर त्याच्या बॅटने शतक झळकावत सर्वांना उत्तर दिलं आहे.

रोहित शर्माने शतकी खेळी साकारल्यानंतर त्याची पत्नी रितिका सजदेह भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी भारतीय कर्णधाराने इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक वनडेत दमदार शतक झळकावत भारताच्या धावांचा पाठलाग करताना शानदार खेळी साकारली. ३९ वर्षीय रोहितने शतक पूर्ण केल्यानंतर बॅट उंचावत जल्लोष केला, त्यावेळी स्टँडमध्ये बसलेल्या रितिकाकडे कॅमेरा पोहोचताच तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.

सामन्यापूर्वी काही वृत्तांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापन आता रोहित शर्मापेक्षा पुढील पर्यायांचा विचार करत असून, युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी देण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. अशा चर्चांदरम्यान रितिकाची लॉर्ड्सवरील उपस्थितीही विशेष चर्चेचा विषय ठरली, कारण रितिका सुरूवातीच्या दोन सामन्यांना उपस्थित नव्हती.

दरम्यान, रोहितच्या शतकानंतर रितिका सजदेहची भावूक प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. रोहित फलंदाजी करत असताना रितिका नेहमीच प्रेक्षकांमध्ये उपस्थित असते आणि त्याच्यासाठी प्रार्थना करताना हाताची बोटं क्रॉस करून बसलेली अनेकदा दिसते. मात्र, यावेळी तिच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून चाहतेही भावूक झाले.

याशिवाय, या सामन्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच रोहितचे माजी सहकारी युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीही प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. तर दिग्गज खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर, क्लाईव्ह लॉईड, ब्रायन लारा व कुमार संगकारासारखे खेळाडू उपस्थित आहेत.