Rohit Sharma Sanju Samson Special Video: संजू सॅमसनने भारताला सेमीफायनलमध्ये नेण्यात मोलाची भूमिका बजावली. वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात संजूने एका टोकाला उभं राहत पहिल्या चेंडूपासून ते अखेरच्या विजयी चौकार लगावत विजयाचा खरा हिरो ठरला. तोच सॅमसन आहे ज्याला काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं देखील कठीण होतं. पण आता संघाच्या विजयाचा स्टार ठरला. त्यानंतर स्पर्धेच्या सुरूवातीला रोहित शर्माचे शब्द खरे ठरलेत.

जेव्हा वेस्ट इंडिजने १९६ धावांचे लक्ष्य दिलं, तेव्हा असं वाटतं होतं की अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवसारखे फलंदाज मोठी खेळी करतील. पण जेव्हा टीम इंडियाने फलंदाजी सुरू केली तेव्हा सारं बदललं. अभिषेक दुसऱ्या षटकात बाद झाला. संजू सॅमसनने संपूर्ण सामन्यात संयम आणि प्रसंगी आक्रमक फटके यांचा योग्य मिलाप साधला. या विश्वचषकातील त्याचा तिसरा सामना खेळत असताना, सॅमसनने पुन्हा एकदा वेगवान सुरुवात केली, जसं त्याने मागील दोन सामन्यांमध्ये केली होती, परंतु त्या दोन सामन्यांमध्ये तो २२ आणि २४ धावांवर बाद झाला होता.

सर्वात महत्त्वाच्या क्षणी, त्याने मोठी खेळी खेळली आणि संघाला विजयाकडे नेलं. संजूचे शतक तीन धावांनी हुकले असले तरी, त्याने नाबाद ९७ धावा करून संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. संजू सॅमसनची २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी देखील निवड झाली होती, पण संघ संयोजन इतकं नीट होतं की त्याला संधी मिळाली नव्हती. या विश्वचषकातही तसंच चित्र होतं. अमेरिकेविरूद्ध भारताच्या गट टप्प्यातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा त्याला भेटला होता. तेव्हा रोहित शर्मा त्याला जे म्हणाला होता, ते खरं ठरलं.

रोहित शर्मा संजू सॅमसनला पहिल्या वर्ल्डकप सामन्यापूर्वी काय म्हणाला होता?

अमेरिकेविरूद्ध टी-२० विश्वचषक सामन्यापूर्वी ब्रँड अम्बेसेडर रोहित शर्माने संपूर्ण संघाची भेट घेतली होती. तेव्हा रोहित सॅमसनला भेटल्यावर म्हणाला होता, “कसा आहेस? दु:खी होऊ नकोस.” त्यावर संजू म्हणाला, “नाही मी ठिके.” त्यावर रोहितने म्हटलं, :ही खूप मोठी स्पर्धा आहे, तुला कधीही खेळण्याची संधी मिळू शकते.: यावर हो म्हणत संजूने मोठी स्माईल देत त्याला मिठी मारली होती. रोहितचे हे शब्द खरे ठरले आणि संजूने संधी मिळताच त्या संधीचं सोनं केलं आहे. हा व्हीडिओ आता आयसीसीने शेअर केला आहे. जो काहीच वेळात व्हायरल झाला आहे.

आता भारताचा सेमीफायनल सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी ४ मार्चला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनल सामना रंगणार आहे.