Romario Shepherd Record: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर ८ फेरीतील ७ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण शेवटी वेस्ट इंडिजच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी मिळून डाव सांभाळला. वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर १७६ धावांपर्यंत मजल मारली. यादरम्यान वेस्ट इंडिजकडून रोमारिओ शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान रोमारिओ शेफर्डच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

रोमारिओ शेफर्डची विक्रमी खेळी

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जाणून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. अवघ्या ८३ धावसंख्येवर संघातील ७ फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे वेस्ट इंडिजवर स्वस्तात ऑल आऊट होण्याचं संकट होतं. पण जेसन होल्डर आणि रोमारिओ शेफर्डने मिळून वेस्ट इंडिजचा डाव सांभाळला.

जेसन होल्डरने ३१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. तर ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोमारिओ शेफर्डने तुफान फटकेबाजी करत ३७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. यासह रोमारिओ शेफर्ड हा टी – २० वर्ल्डकप स्पर्धेत ९ व्या क्रमांकावर येऊन अर्धशतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला ९ व्या क्रमांकावर येऊन अर्धशतक झळकावता आलं नव्हतं. दोघांनी ९ व्या विकेटसाठी फलंदाजी करताना ५७ चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली. ही टी -२० क्रिकेटमध्ये ९ व्या विकेटसाठी केलेली सर्वात मोठी धावसंख्या आहे.

वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार एडेन मारक्रम आणि क्विंटन डी कॉकची जोडी मैदानावर आली. या दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९५ धावा जोडल्या. डी कॉकने ४७ धावा केल्या. तर मारक्रमने नाबाद ८२ आणि रायन रिकल्टनने नाबाद ४५ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.