Asian Games 2026 India Ronaldo David Beckham Profile: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सांघिक व वैयक्तिक प्रकारात भारताने सुवर्णपदकांसह तिन्ही पदकांच्या संख्येत सातत्याने वाढ केली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू आपआपल्या क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत आपलं नाव कमावत आहेत. यादरम्यान रोनाल्डो व डेव्हिड बेकहॅम हे दोन खेळाडू भारताकडून खेळताना दिसतील.

२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानमध्ये भारताच्या दोन सायकलपटूंनी आपल्या नावांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन खेळाडूंची नावं आहेत रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम. ही नावं ऐकताच फुटबॉल चाहत्यांसमोर लगेच ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम यांचे चेहरे दिसतात. मात्र, हे दोघे फुटबॉलपटू नसून भारतीय ट्रॅक सायकलपटू रोनाल्डो सिंग लायटोनजाम आणि डेव्हिड बेकहॅम एल्काटोहचोन्गो आहेत. दोघांनीही गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे.

मणिपूरचा रोनाल्डो सिंग लायटोनजाम हा भारतातील आघाडीच्या स्प्रिंट सायकलपटूंपैकी एक आहे. त्याने आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरून इतिहास घडवला आहे. विशेष म्हणजे, रोनाल्डोचं नाव ख्रिस्तियानो रोनाल्डोवरून ठेवण्यात आलेलं नाही. त्याचं नाव ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याच्यावरून ठेवण्यात आलं आहे. आपल्या वेगवान आणि दमदार कामगिरीच्या जोरावर रोनाल्डो सिंग हा ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताच्या प्रमुख पदकांच्या आशांपैकी एक बनला आहे.

डेव्हिड बेकहॅम एल्काटोहचोन्गो हा आणखी एक प्रतिभावान सायकलपटू आहे. भारतातील वेगवान सायकलपटूंमध्ये त्याने आपलं स्थान निर्माण केलं आहे. बेकहॅमने स्प्रिंट प्रकारात अनेक राष्ट्रीय विजेतेपदं मिळवण्याबरोबरच राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. फुटबॉलच्या मैदानाऐवजी व्हेलोड्रोमवर दमदार कामगिरी करत त्याने आपल्या प्रसिद्ध नावाला साजेसा ठसा उमटवला आहे.

Ronaldo Singh and David Beckhame India track cycling
रोनाल्डो-डेव्हिड बेकहॅम

जगभरातील चाहत्यांना सुरुवातीला आशियाई क्रीडा स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न पडला. मात्र, नंतर भारताच्या या दोन सायकलिंग स्टार्समागची रंजक कहाणी समोर आली. या व्हायरल चर्चेपलीकडे, रोनाल्डो सिंग आणि डेव्हिड बेकहॅम एल्काटोहचोन्गो हे दोन्ही सायकलपटू नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देत आहेत. फुटबॉलमधील दिग्गज खेळाडूंशी त्यांची नावं जुळत असली, तरी ट्रॅकवर आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ते स्वतःची वेगळी ओळख आणि वारसा निर्माण करत आहेत.