* बॅले, रोनाल्डोच्या गोलने आयबरचा पराभव
* जेतेपदाच्या शर्यतीत कायम
रिअल माद्रिदने गॅरेथ बॅले आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर आयबर क्लबचा २-० असा पराभव करून रिअल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखले आहे.
गेल्या आठवडय़ात बार्सिलोनाने यजमान माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे ला लीगा स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतील त्यांचे आव्हान धोक्यात आले होते, परंतु सोमवारच्या लढतीत माद्रिद विजयपथावर परतल्याने जेतेपदासाठी चुरस वाढली आहे. या विजयामुळे माद्रिदच्या खात्यात १३ सामन्यांत २७ गुण जमा झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या, तर बार्सिलोना (३३) व अ‍ॅटलेटिको माद्रिद (२९) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.
४३ व्या मिनिटाला लुका मॉड्रिकने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू बॅलेने हेडरद्वारे गोलजाळीत तटवून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर आयबरकडून आक्रमक खेळ झाला. ५६ व्या मिनिटाला गोल करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर माद्रिदने सावध खेळ करीत सामन्यावर पकड कायम राखली. ८२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोने गोल करून माद्रिदची आघाडी २-० अशी मजबूत केली. या आघाडीसह माद्रिदने विजय मिळवताना गुणतालिकेत आगेकूच केली. ‘‘तीन गुण मिळवणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि ते संपूर्ण ताकदीने खेळले की विजय निश्चित असतो, हे प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला हवे. भविष्यात सातत्यपूर्ण खेळ करण्यावर भर असेल,’’ असे मत माद्रिदचे प्रशिक्षक राफेल बेनिटेझ यांनी व्यक्त केले.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात सेव्हिल्लाने १-० अशा फरकाने व्हेलेसिंआवर विजय मिळवला. या पराभवामुळे व्हेलेसिंआचे प्रशिक्षक नुनो इस्पीरिटो यांनी क्लबसोबत हा शेवटचा सामना असल्याचे स्पष्ट केले. ५० व्या मिनिटाला सेर्गीओ इस्कूडेरोने केलेला गोल निर्णायक ठरला. अ‍ॅथलेटिक बिलबाओ क्लबने अ‍ॅरित्ज अ‍ॅडुरिझच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रायो व्हॅलेंकानोवर ३-० असा दणदणीत विजय नोंदवला.