पोर्तुगालविरुद्ध जर्मनीला विजय अनिवार्य

एपी, म्युनिक

युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील खडतर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फ’ गटात शनिवारी रात्री पोर्तुगाल आणि जर्मनी हे दोन बलाढय़ आमनेसामने येणार आहेत. पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ऐन भरात असल्यामुळे या लढतीला एकप्रकारे रोनाल्डो विरुद्ध जर्मनी असे स्वरूप प्राप्त झाले असून स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी जर्मनीला विजय मिळवणे अत्यावश्यक आहे.

जोकिम ल्यू यांच्या प्रशिक्षणाखाली अखेरची स्पर्धा खेळणाऱ्या जर्मनीला पहिल्या लढतीत फ्रान्सकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. मॅट्स हुमेल्सने केलेला स्वयंगोल जर्मनीला महागात पडला. फ्रान्सने नोंदवलेले दोन गोल ऑफ-साइड ठरवण्यात आले असले, तरी यामुळे जर्मनीच्या बचाव फळीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. त्यामुळे आता जर्मनीने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

दुसरीकडे हंगेरीविरुद्ध अखेरच्या १० मिनिटांत तीन गोल नोंदवून पोर्तुगालने विजयी सलामी नोंदवली. यामध्ये रोनाल्डोचे दोन गोल होते. सध्या पोर्तुगालचा संघ ‘फ’ गटात अग्रस्थानी असून जर्मनीला नमवून बाद फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी पोर्तुगालचे खेळाडू उत्सुक असतील. ३६ वर्षीय रोनाल्डोने जर्मनीविरुद्ध खेळलेल्या चार सामन्यांत आजपर्यंत एकही गोल केलेला नाही. त्यामुळे रोनाल्डोसुद्धा जर्मनीविरुद्धची अपयशाची मालिका खंडित करण्यासाठी आतुर असेल.

तत्पूर्वी, शनिवारी सायंकाळी होणाऱ्या लढतीत विश्वविजेत्या फ्रान्सची हंगेरीशी गाठ पडणार आहे. शनिवारी मध्यरात्री स्पेन आणि पोलंड यांच्यातील द्वंद्व फुटबॉल चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

१८ जर्मनी-पोर्तुगाल यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले असून जर्मनीने १०, तर पोर्तुगालने तीन लढती जिंकल्या आहेत. पाच सामने बरोबरीत सुटले आहेत.

६ युरो चषकात जर्मनी-पोर्तुगाल सहाव्यांदा आमनेसामने येत असून पोर्तुगालने २०००मध्ये जर्मनीविरुद्ध या स्पर्धेतील अखेरचा विजय मिळवला आहे.

आम्हाला अद्यापही सहा गुण कमावून बाद फेरी गाठण्याची संधी आहे. फ्रान्सविरुद्धच्या पराभवाला मागे सारून या सामन्याकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. गेल्या लढतीत आमच्या आक्रमणपटूंनी उत्तम कामगिरी केली. मात्र त्यांना गोल करणे जमले नाही. यंदा ते गोल झळकावण्यात नक्कीच यशस्वी होतील, याची खात्री आहे.

जोकिम ल्यू, जर्मनीचे प्रशिक्षक