आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी पदकदायी ठरला. वुशू या खेळात रोशिबिना देवीने रौप्यपदकाची कमाई केली. मात्र या पदकाला वादाची किनार आहे. रोशिबिना देवीने महिलांच्या ६० किलो सांडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. चीनच्या झांग झिओयू सुवर्णपदकाची मानकरी ठरली. रोशिबिनाचा भारतीय संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. सलग तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोशिबिनाने पदकावर नाव कोरलं आहे.

२०१८ मध्ये जाकार्ता इथे झालेल्या स्पर्धेत रोशिबिनाने कांस्यपदक मिळवलं होतं. २०२३ मध्ये हांगझाऊ स्पर्धेत रोशिबिनाने पदकाचा रंग बदलत रौप्यपदकाची कमाई केली. जपानमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतही पदक नावावर करत रोशिबिनाने अनोखा विक्रम रचला. सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वुशू खेळात पदक पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

रोशिबिना देवी कोण आहे?

मणिपूरमधल्या बिश्नूपूर जिल्ह्यातल्या क्वासिफाई मेयाई लेकाई इथे रोशिबिनाचा जन्म झाला. वुशू खेळातल्या अव्वल भारतीय खेळाडूंमध्ये तिचा समावेश होतो. सांडा या प्रकारात ती खेळते. यामध्ये स्ट्रायकिंग, किकिंग आणि थ्रोइंग यांचा समवेश असतो. मणिपूरमध्ये जिल्हा स्तरीय स्पर्धा बघताना रोशिबिनाला वुशूची आवड निर्माण झाली. तिने बॉक्सिंगपासून सुरुवात केली. पण नंतर वुशूवर लक्ष केंद्रित केलं. स्थानिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सुरुवात केल्यानंतर तिने इंफाळ इथल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक माबाम प्रेमकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनात सरावाला सुरुवात केली.

२०१६ मध्ये रोशिबिनाने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. बल्गेरिया इथे झालेल्या स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटातून खेळताना पदक मिळवलं होतं. पुढच्याच वर्षी तिने ६० किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरलं. २०१८ मध्ये तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत १७व्या वर्षी पदार्पण केलं. पाकिस्तानच्या खेळाडूला नमवत तिने सेमी फायनल गाठली. सेमी फायनलमधये चीनच्या खेळाडूसमोर तिचा पराभव झाला. तिच्या पदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशू खेळात पहिल्यांदाच पदक मिळालं.

त्याचवर्षी रोशिबिनाने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य तर मॉस्को स्टार्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं. २०२३ मध्ये रोशिबिनाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय वुशू महासंघाने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिची निवड केली.

रोशिबिनाच्या निवडीवरून वाद का उद्भवला?

रोशिबिनाचा यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात समावेश करण्यात आला नाही. निवड चाचणी स्पर्धेत दिव्यांशी चौधरीने रोशिबिनावर मात केली. मात्र दुखापतीच्या कारणास्तव दिव्यांशीचं नाव वगळण्यात आलं आणि रोशिबिनाचा मार्ग सुकर झाला.

दिव्यांशी हिला एएलसी टिअर दुखापत झाल्याचं भारतीय वुशू संघटेनेनं सांगितलं. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्यामुळे तिच्याऐवजी रोशिबिनाची निवड करण्यात आली. ही घोषणा होताच नाराज दिव्यांशी एक व्हीडिओ शेअर केला. रोशिबिनाने छळ केला असून, मला त्रास दिल्याचं दिव्यांशीने सांगितलं. पतियाळा इथे झालेल्या कॅम्पदरम्यान रोशिबिनाने जाणीवपूर्वक खांद्याला दुखापत होईल असा प्रयत्न केला असं दिव्यांशीने सांगितलं होतं.

दिव्यांशीने आणखी एक व्हीडिओही शेअर केला. आत्महत्या करण्याचा विचार तिने या व्हीडिओत बोलून दाखवला. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघातून वगळण्यात आल्याचं सांगण्यात आलं नाही असा आरोप दिव्यांशीने केला. दरम्यान वुशू संघटनेनं मात्र दिव्यांशीला वगळणं हे वैद्यकीय कारणास्तव असल्याचं सांगितलं. तिची दुखापत गंभीर आहे त्यामुळे ती खेळू शकत नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. यामुळे तिच्याऐवजी रोशिबिनाची निवड करण्यात आली असं संघटनेने सांगितलं.

या व्हीडिओसाठी दिव्यांशीने माफी मागितली. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आल्याचा निर्णयही स्वीकारला मात्र तिने रोशिबिनाची माफी मागितली नाही.

रोशिबिनाने हा सगळा प्रकार बाजूला सारत खेळावर लक्ष केंद्रित केलं. बांगलादेशच्या शिखा खातूनवर तिने विजय मिळवला. त्यानंतर मकावच्या चू मान सिनवर ५-० अशी मात केली. इंडोनेशियाच्या थानिआ कुसुमांगितसला २-० असं नमवलं. फायनलच्या मुकाबल्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.