नऊ विकेट्स राखून विजय; गेल, कोहली, डी’व्हिलियर्स त्रिकुट चमकले

ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स या धडाकेबाज फलंदाजांच्या त्रिकुटाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध नऊ विकेट्स राखून दिमाखदार विजय मिळवून दिला. कोलकाताच्या १८४ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना फॉर्ममध्ये नसलेल्या गेलने संघाला दणक्यात सुरुवात करून दिली. गेल बाद झाल्यावर कोहली आणि डी’व्हिलियर्स यांनी दमदार फलंदाजीच्या जोरावर नाबाद अर्धशतके लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सातत्याने अपयशी ठरत असूनही बंगळुरु संघाने गेलला संघात कायम राखले आणि त्याने ३१ चेंडूत ४९ धावांची संघाचा विश्वास सार्थ ठरवला. कोहली आणि गेल जोडीने ७.३ षटकांत ७१ धावांची सलामी दिली. नरिनने गेलला बाद केले. यानंतर कोहली आणि डी’व्हिलियर्स जोडीने ११५ धावांची अभेद्य भागीदाकी रचत बंगळुरुला विजय मिळवून दिला. कोहलीला १७ धावांवर असताना सूर्यकुमार यादवने तर ३२ धावांवर गंभीरने जीवदान दिले. याचा पुरेपुर फायदा उठवत कोहलीने चेंडूत ५१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा पूर्ण करणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला. डी’व्हिलियर्सने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांची वेगवान खेळी केली.

तत्पूर्वी गौतम गंभीर, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने १८३ धावांची मजल मारली. रॉबिन उथप्पा केवळ ८ धावा करुन बाद झाला. मात्र यानंतर गंभीरने मनीष पांडेच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. अर्धशतकानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गंभीर बाद झाला. त्याने ३४ चेंडूत ७ चौकारांसह ५१ धावा केल्या. पांडेही अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. धडाकेबाज फलंदाज युसुफ पठाणला युझवेंद्र चहलने झटपट बाद केले. आंद्रे रसेलने १९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. शकीब अल हसनने ११ चेंडूत १८ धावा करत त्याला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ५ बाद १८३ (गौतम गंभीर ५१, मनीष पांडे ५०; श्रीनाथ अरविंद २/४१)पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : १८.४ षटकांत १ बाद १८६ (विराट कोहली नाबाद ७५, एबी डी’व्हिलियर्स नाबाद ५९; सुनील नरिन १/३४).