अहमदाबाद : कोणतीही स्पर्धा जिंकणे अवघडच, पण त्याहूनही अवघड म्हणजे गतवर्षीचे जेतेपद टिकवणे! रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने हे अवघड काम करून दाखवताना सलग दुसर्‍या वर्षी ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावण्याची किमया साधली. बंगळूरुचा कर्णधार रजत पाटीदारने या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करतानाच ‘आम्ही केवळ जिंकलो नाही, तर प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवले,’ असे म्हणत संघ-सहकार्‍यांची पाठ थोपटली.

बंगळूरुचा संघ तब्बल १८ वर्षे ‘आयपीएल’ जेतेपदाच्या शोधात होता. कोहली, गेल, डिव्हिलियर्स असे एकाहून एक मातब्बर फलंदाज संघात असूनही बंगळूरुला जेतेपद हुलकावणी देत होते. परंतु गतवर्षी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि बंगळूरुच्या व्यवस्थापनाने मिळून लिलावात संतुलित संघ तयार करण्यास प्राधान्य दिले. तसेच नेतृत्वाची धुरा पाटीदारकडे सोपविण्यात आली. या धाडसी निर्णयांचे फळ बंगळूरुला मिळाले असून त्यांनी सलग दोन वेळा ‘आयपीएल’ जिंकण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा बंगळूरु केवळ तिसरा संघ ठरला. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने असे यश संपादन केले होते.

बंगळूरुने यंदाच्या हंगामाची सुरुवात घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबाद संघाचा धुव्वा उडवत केली होती. त्यानंतर कामगिरीत सातत्य राखत त्यांनी साखळी फेरीअंती गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. मग ‘क्वालिफायर-१’ आणि अंतिम लढतीत गुजरात टायटन्सला धूळ चारत बंगळूरुने जेतेपद आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.

‘‘अगदी खरे सांगायचे तर गेल्या वर्षी आमच्यावर प्रचंड दडपण होते. परंतु आम्ही जेतेपदाची प्रतीक्षा गतवर्षी संपवली आणि गोष्टी बदलल्या. यंदा आम्हाला शांतपणे आमचा सर्वोत्तम खेळ दाखवता आला. आम्ही संपूर्ण स्पर्धेदरम्यान सातत्य टिकवले. आम्ही केवळ खेळलो किंवा जिंकलो नाही, तर प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवले,’’ असे पाटीदार रविवारी झालेल्या अंतिम लढतीनंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

‘‘आम्ही संपूर्ण स्पर्धेत दबदबा राखू याची खात्री होतीच. तसेच सलग दुसर्‍यांदा जेतेपद पटकावण्याचाही विश्वास होता. आम्ही आमचे ध्येय गाठले याचा निश्चितच आनंद आहे,’’ असेही पाटीदारने नमूद केले.

विशेष म्हणजे, पाटीदारला आपल्या ३३व्या वाढदिवशीच ‘आयपीएल’चा करंडक दुसर्‍यांदा उंचावण्याची संधी मिळाली. ‘‘वाढदिवसाची यापेक्षा चांगली भेट मिळूच शकली नसती. आमच्या सांघिक कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आता जेतेपदाची हॅटट्रिक कशी साधता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू,’’ असेही पाटीदारने सांगितले.

कोहलीचे विशेष कौतुक

अंतिम लढतीत अवघड खेळपट्टीवर विराट कोहलीने ४२ चेंडूंत नाबाद ७५ धावांची खेळी करत बंगळूरुला विजयी केले. त्यामुळे सामन्यानंतर कर्णधार पाटीदारने त्याचे विशेष कौतुक केले. ‘‘कोहलीला खास गोष्टी करायची सवय आहेच. तो किती उच्च दर्जाचा खेळाडू आहे हे आपण सर्व जाणतोच. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मला शब्द अपुरे पडतील. आम्हाला मैदानावर आणि मैदाबाहेरही त्याच्याकडून खूप शिकायला मिळते,’’ असे पाटीदार म्हणाला.

विजयी मिरवणूक नाही

गतवर्षीप्रमाणे दुर्घटना घडू नये यासाठी यंदा बंगळूरु संघाची विजयी मिरवणूक ठेवण्यात आली नाही. गेल्या हंगामात बंगळूरु संघाच्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाचा जल्लोष करण्यासाठी काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये, तसेच चिन्नास्वामी स्टेडियमजवळच असलेल्या लोकभवनात डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा नियोजित असल्याने बंगळूरु संघाने विजयी मिरवणूक काढणे टाळले.

गतवर्षीसारखे दडपण नव्हते!

बंगळूरुच्या संघाने ‘आयपीएल’ जेतेपदाची १८ वर्षांची प्रतीक्षा गेल्या हंगामात संपवली. हे यश अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे कोहलीला वाटते. ‘‘यंदा गेल्या वर्षीसारखे दडपण जाणवत नसल्याचे मी सहकार्‍यांना म्हणालो होतो. आमच्या संघातील खेळाडूंची क्षमता

आम्हाला ठाऊक होती. स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि योजनांची योग्य अंमलबजावणी केली, तर आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम संघ ठरू याची खात्री होती,’’ असे कोहली अंतिम लढतीनंतर म्हणाला.

२० कोटींचे पारितोषिक

‘आयपीएल’चे जेतेपद पटकावल्याबद्दल बंगळूरु संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) २० कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता गुजरात संघ १२.५० कोटी, तर राजस्थान रॉयल्स संघ ७ कोटी आणि सनरायजर्स हैदराबाद संघ ६.५० कोटी रुपयांचा मानकरी ठरला.

‘स्ट्राइक रेट’ सुधारणेसाठी मानसिकतेतील बदल निर्णायक -कोहली

अहमदाबाद : वयाच्या ३७व्या वर्षी आणि १९ हंगाम खेळल्यानंतर ‘आयपीएल’मधील सर्वांत जलद अर्धशतक साकारणार्‍या विराट कोहलीने खेळातील नाही, तर मानसिकतेतील बदलामुळे ‘स्ट्राइक रेट’मधील सुधारणा शक्य झाल्याचे वक्तव्य केले. तसेच विजयी षटकार मारून संघाला अंतिम रेषा पार करून देणेही स्वप्नवत असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

अंतिम लढतीत गुजरात टायटन्सविरुद्ध कोहलीने ४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा फटकावल्या. त्याने १८व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार खेचत बंगळूरुच्या विजयावर शिक्कामोर्बत केले. त्याने अवघ्या २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे ‘आयपीएल’ कारकीर्दीतील सर्वांत जलद अर्धशतक ठरले.

‘‘माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता युवा खेळाडू पुढे येऊन अतिशय निडरपणे आणि आक्रमक शैलीत फलंदाजी करत आहेत. त्यामुळे मलाही धावांची गती वाढवणे भाग पडले आहे. परंतु खेळातील नाही, तर मानसिकतेतील बदलामुळे हे शक्य झाले आहे. गोलंदाजावर कसे दडपण निर्माण करता येईल आणि अधिकाधिक धावा कशा करता येतील याचाच मी विचार करतो,’’ असे कोहलीने नमूद केले.

यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील पहिल्या १० सामन्यांत बंगळूरुच्या विविध आठ खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार मिळवला. ही सर्वाधिक समाधान देणारी बाब ठरल्याचेही कोहली म्हणतो.