Royal Challengers Bengaluru vs Chenai Super Kings: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळताना विजयाचा चौकार मारला आहे. गेल्या तिन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. स्पर्धेतील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईसमोर विजयासाठी २५१ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईल २०७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह बंगळुरूने हा सामना ४३ धावांनी जिंकून सलग दुसरा विजय मिळवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी २५१ धावांचे आव्हान ठेवले होते. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर ककिंग्ज संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण हवी तशी सुरुवात मिळाली नाही. संजू सॅमसन अवघ्या ९ धावा करून माघारी परतला. तर ऋतुराज गायकवाड ७ धावांवर माघारी परतला. गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर आयुष म्हात्रे या सामन्यात १ धाव करून माघारी परतला.

सुरुवातीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर सर्फराज खानने संघाचा डाव सांभाळला. त्याने २५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ५० धावांची खेळी केली. कार्तिक शर्मा अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. तर शिवम दुबे १८ धावांवर बाद झाला. युवा फलंदाज प्रशांत वीरने आपल्या फलंदाजीने सर्वांचं मन जिंकलं. त्याने २९ चेंडूत ४३ धावा केल्या. तर जेमी ओव्हरटनने १६ चेंडूत ३७ धुवा केल्या. शेवटी अंशूल कंबोज १९ धावांवर नाबाद राहिला. पण चेन्नई सुपर किंग्ज संघाचा डाव २०७ धावांवर आटोपला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ४३ धावांनी आपल्या नावावर केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उभारला २५० धावांचा डोंगर

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फिल सॉल्टने ४६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने २८ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने ५० धावा केल्या. रजत पाटीदारने नाबाद ४८ धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने नाबाद ७० धावांची खेळी केली.