Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, WPL 2026 Final: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने २०३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ गडी राखून विजयाची नोंद केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०४ धावांची गरज होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी इतिहास घडवायचा होता. कारण याआधी महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात कुठल्याही संघाने इतकी मोठी धावसंख्या उभारली नव्हती. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. ग्रेस हॅरिस अवघ्या ९ धावा करून माघारी परतली. पण त्यानंतर स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोलने मिळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. स्मृती मानधनाने८७ आणि जॉर्जिया वोलने ७९ धावांची खेळी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून लिजेल ली ने ३७ धावांची खेळी केली. तर शफाली वर्माने २० धावांची खेळी केली. तर लॉरा वोल्वार्ड्टने ४४ धावांची खेळी केली. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने एकाकी झुंज देत ३७ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार मारले. तर शिनेल हेनरीने १५ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ४ चौकार आणि २ षटकार मारले. यासह दिल्ली कॅपिटल्स संघाने २० षटकांअखेर ४ गडी बाद २०३ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्यांदा उंचावली जेतेपदाची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या संपूर्ण स्पर्धेत चॅम्पियनसारखा खेळ केला. पहिल्या सामन्यापासून कर्णधार स्मृती मानधनाने फलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. सर्वाधिक धावा करत ती या स्पर्धेत ऑरेंज कॅपची मानकरी ठरली.

