आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रायपूरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठे धक्के दिले. पण शेवटी कृणाल पंड्या खंबीरपणे उभा राहिला. गेल्या सामन्यातही कृणाल पंड्याने शेवटपर्यंत झुंज दिली होती. पण विजय थोडक्यात हुकला होता. पण यावेळी त्याने आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना दमदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना २ गडी धावा राखून आपल्या नावावर केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहली शून्यावर माघारी परतला. तर जेकब बेथेलने २७ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने १२ धावांची खेळी केली. रजत पाटीदारने ८ धावा केल्या. पण कृणाल पंड्याने सामना फिरवला. त्याने ७३ धावांची खेळी केली. जितेश शर्मा १८ धावा करून माघारी परतला. शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना २ गडी राखून विजय मिळवला.

मुंबईने केल्या १६६ धावा

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. हा निर्णय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. मुंबईला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. रायन रिकल्टन अवघ्या २ धावा करून माघारी परतला. तर रोहित शर्माने २२ धावा करून पॅव्हेलियनची वाट धरली. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर माघारी परतला. त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्माने मिळून मुंबईचा डाव सांभाळला. नमन धीरने ३२ चेंडूत ४७ धावा चोपल्या. तर तिलक वर्माने ४२ चेंडूत ५७ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर मुंबईने सामन्यात पुनरागमन केलं. विल जॅक्स अवघ्या १० धावांवर बाद झाला. तर राज अंगद बावाने १६ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या ७ गडी बाद १६६ धावांवर पोहोचवली.

या पराभवासह मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबईने ११ सामन्यांपैकी ८ सामने गमावले आहेत. तर केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईला केवळ ६ गुणांची कमाई करता आली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ११ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. १५ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.