महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील १८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. यूपी वॉरियर्स संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना १४३ धावा केल्या होत्या. विजयासाठी मिळालेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी अवघ्या १३.१ षटकात आव्हान पूर्ण करत ८ गडी राखून विजयाची नोंद केली. हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या स्पर्धेतील सहावा विजय ठरला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

यूपी वॉरियर्सने केल्या १४३ धावा

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून यूपी वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या आमंत्रणाचा स्वीकार करून यूपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्मा आणि मेग लेनिंगची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. कर्णधार मेग लेनिंग ४१ धावा करत माघारी परतली. पण दुसऱ्या बाजूने दीप्ती शर्माने धावा करणं सुरू ठेवलं. दीप्ती शर्माने ४३ चेंडूत ५५ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. पण तिला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. हरलीन देओल अवघ्या १४ धावा करत माघारी परतली. तर सिमरन शेखने १० धावांचे योगदान दिले. यूपी वॉरियर्स संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १४३ धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून धावांचा यशस्वी पाठलाग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी १४४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीला आलेल्या ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधना यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. ग्रेस हॅरिसने ३७ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. स्मृती मानधनाने २७ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ४१ चेंडू शिल्लक ठेवून आपल्या नावावर केला.