rRCB vs CSK Head To Head Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बलाढ्य सनरायझर्स हैदराबाद संघावर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ लागोपाठ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाला या हंगामात हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने पराभूत केलं. लागोपाठ २ सामने गमावलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर आता बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं आव्हान असणार आहे. गेल्या ३ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला,तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३५ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाचं पारडं जड राहिलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने २१ सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला १३ सामने जिंकण्यात यश आलं आहे.

आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर चेन्नई सुपर किंग्ज संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर भारी पडला आहे. पण गेल्या काही सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जवर दबदबा निर्माण केला आहे. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर विजय मिळवला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे विजयाचा चौकार मारण्याची संधी असणार आहे.