Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेत चॅम्पियनसारखीच सुरुवात केली आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी २०२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ गडी राखून विजयाची नोंद केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०२ धावा करायचा होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी मैदानावर आली. पण या संघाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. सलामीवीर फिल सॉल्ट अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने दमदार फलंदाजी केली. पडिक्कलने अवघ्या २६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ६१ धावांची खेळी केली. त्याने विराटसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. पडिक्कल बाद झाल्यानंतर विराटने कर्णधार रजत पाटीदारसोबत मिळून भागीदारी केली. रजत पाटीदारने ३१ धावांची खेळी केली. जितेश शर्मा शून्यावर माघारी परतला. तर विराट कोहलीने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ३८ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

हैदराबादने दिलं २०२ धावांचं आव्हान

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २०१ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली होती. या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण ही जोडी स्वस्तात माघारी परतली.

ट्रॅव्हिस हेड अवघ्या ११ धावा करत माघारी परतला. तर अभिषेक शर्मा ७ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशनने ८० धावांची दमदार खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ३१ धावांची खेळी केली. शेवटी अनिकेत वर्माने ४१ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २०१ धावांवर पोहोचवली.