Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings: आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरला आहे. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला नमवल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर २५० धावांचा भलामोठा डोंगर उभारला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

एकापेक्षा एक स्टार फलंदाजांची फौज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २०० धावांचा डोंगर उभारताच मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. बंगळुरूचा संघ हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस २०० धावांचा डोंगर उभारणाऱ्या संघांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज संघ अव्वल स्थानी होता. चेन्नईने आतापर्यंत ३६ वेळा २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ देखील अव्वल स्थानी पोहोचला आहे. मुख्य बाब म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उभारला २५० धावांचा डोंगर

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फिल सॉल्टने ३० चेंडूत ४६ धावा केल्या. तर विराट कोहली १८ चेंडूत २८ धावाकरून माघारी परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हवी तितकी वेगवान सुरुवात मिळाली नव्हती. पण शेवट मात्र वेगवान झाला.

देवदत्त पडिक्कलने २९ चेंडूत ५० धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. कर्णधार रजत पाटीदारने १९ चेंडूत ताबडतोड ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १ चौकार आणि ६ षटकार खेचले. तर टीम डेव्हिडने २५ चेंडूत ७० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ८ षटकार खेचले. हे दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.