IPL 2026 RR vs LSG Highlights In marathi: राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. राजस्थानचा संघ या विजयासह प्लेऑफमधील शर्यतीत कायम आहे. राजस्थानच्या या विजयाचा हिरो वैभव सूर्यवंशी ठरला. सूर्यवंशीचं शतक हुकलं असलं तरी त्याने वादळी खेळी साकारत संघाच्या विजयात ध्रुव जुरेलसह मोठं योगदान दिलं.

राजस्थान रॉयल्सचा संघ १४ गुणांसह या विजयानंतर चौथ्या स्थानी पोहोचला आहे. यासह राजस्थान रॉयल्सकडे प्लेऑफ गाठण्याची मोठी संधी असून त्यांना मुंबई इंडियन्सविरूद्धचा अखेरचा सामना जिंकावा लागणार आहे.

लखनौने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने संघाला वादळी सुरूवात करून दिली. यशस्वी २३ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ४३ धावा करत बाद झाला. तर वैभव सूर्यवंशीने ध्रुव जुरेलसह संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी ४५ चेंडूत १०५ धावा केल्या. सूर्यवंशीचं शतक हुकलं असलं तरी त्याने ३८ चेंडूत ७ चौकार व १० षटकारांसह ९३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर ध्रुव जुरेलने अर्धशतक करत ३८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर फरेराने १६ धावांचं योगदान दिलं. अखेरच्या षटकात २ धावांची गरज असताना फरेराने षटकार लगावत सामना जिंकून दिला आहे.

राजस्थानने सामन्याची नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. जोश इंग्लिस व मिचेल मार्शच्या जोडीने संघाला वादळी सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी ५० चेंडूत १०९ धावांची भागीदारी साकारली. जोश इंग्लिसने २९ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. तर मिचेल मार्श पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठ्यावर येत बाद झाला. मार्शने या सामन्यात ५७ चेंडूत ११ चौकार व ५ षटकारांसह ९६ धावांची खेळी केली. निकोलस पुरनने १६ धावांचं योगदान दिलं. तर पंतने ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला २२० धावांपर्यंत नेलं.