IPL 2026 RR beat MI By 27 Runs: मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला सामना जिंकून मात्र पुढील दोन सामने देवाला दिलेत. आता राजस्थान रॉयल्स संघाने चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर मोठा पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्याच चेंडूपासून आपला दबदबा राखत मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने यासह सुरूवातीचे तिन्ही सामने जिंकत विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे.
पावसामुळे ११-११ षटकांच्या या सामन्यात सुरूवातीपासूनच राजस्थान रॉयल्सचा संघ ड्रायव्हिंग सीटवर होता. वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालने संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचत राजस्थानच्या गोलंदाजांनी यावर विजयाचा कळस चढवला. राजस्थानने ११ षटकांत प्रथम फलंदाजी करताना ११ षटकांत ३ बाद १५० धावा केल्या. तर मुंबईचा संघ प्रत्युत्तरात ११ षटकांत ९ बाद १२२ धावा करू शकला.
मुंबई इंडियन्सने १५१ धावांच्या प्रत्युत्तरात किती धावा केल्या?
राजस्थानने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात खूपच खराब झाली. पहिल्या षटकात रायन रिकल्टन झेलबाद झाला. तर सूर्या दुसऱ्या षटकात माघारी परतला. यानंतर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा झेलबाद झाला. तर हार्दिक पंड्या व तिलक वर्मा पाचव्या षटकात माघारी परतले. मुंबईचे टॉप-५ फलंदाज फक्त ४६ धावांवर माघारी परतले.
झटपट ५ विकेट्स गमावल्यानंतर नमन धीर व शेरफेन रूदरफोर्डने संघाचा डाव सावरला. पण तुषार देशपांडने रूदरफोर्डला बाद करत मुंबईच्या पुनरागमनाच्या आशांवर पाणी फेरलं. त्यानंतर नमन धीर २५ धावा करत बाद झाला. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वबाद होण्याच्या मार्गावर होता, पण बुमराह व चहरने कसंबसं अखेरचं षटक काढलं. यासह मुंबईचा संघ ११ षटकांत ९ बाद १२३ धावा करू शकला.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यशस्वी व वैभवने पहिल्या विकेटसाठी ३० चेंडू ८० धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशी १४ चेंडूत ५ षटकार व एका चौकारासह ३९ धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वालने ३२ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची नाबाद खेळी केली. तर रियान परागने २० धावांचं योगदान दिलं. यासह ११ षटकांत राजस्थानने १५० धावांची विक्रमी धावसंख्या रचली. मुंबईकडून अल्लाह गझनफरने २ विकेट्स तर शार्दुल ठाकूरने एक विकेट घेतली.
