राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजत संघाचा विजयीरथ रोखला. पंजाब किंग्सने या सामन्यासह यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना ६ विकेट्सने गमावला आहे. राजस्थानकडून शुभम दुबे व डोनावन फरेरा यांनी ७७ धावांची खेळी केली आणि संघाचा विजय निश्चित केला. तर पंजाब किंग्सकडून मार्कस स्टॉयनिसने ६६ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली होती.
पंजाबने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने दणदणीत सुरूवात केली. वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात षटकार मारत संघाच्या वेगवान रन चेसला सुरूवात केली. वैभव सूर्यवंशी १६ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने २७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यानंतर ध्रुव जुरेल १६ धावा तर रियान पराग २९ धावा करत माघारी परतले. यानंतर डोनावर फरेरा आणि शुभम दुबे यांनी संघाला विजय मिळवून दिला.
डोनावन फरेराने २६ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. तर शुभम दुबेने १२ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांची खेळी केली. या दोघांच्या ७७ धावांच्या भागीदारीमुळे १९.२ षटकांत २२८ धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्य यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. प्रियांश आर्य २९ धावा करत बाद झाला. तर प्रभसिमरन सिंगने ४४ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह५९ धावांची खेळी कली. तर कुपर कॉनोली व श्रेयस अय्यर दोघांनी प्रत्येकी ३०-३० धावांचं योगदान दिलं. तर मार्कस स्टॉयनिसने अखेरच्या षटकांमध्ये वादळी फटकेबाजी केली आणि संघाला २०० धावांच्या पलीकडे नेलं.
मार्कस स्टॉयनिसने २२ चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांसह २८१च्या स्ट्राईक रेटने ६२ धावांची खेळी केली. स्टॉयनिसच्या या फटकेबाजीसह पंजाब किंग्सने २० षटकांत ४ बाद २२२ धावांची खेळी केली. राजस्थानकडून यश राज पुंजा या नव्या खेळाडूने २ विकेट्स घेतल्या. तर आर्चर, बर्गर यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
