RR beat RCB By 6 Wickets: वैभव सूर्यवंशी व ध्रुव जुरेल या जोडीने मिळून राजस्थान रॉयल्सला स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवून दिला आहे. राजस्थानने आरसीबीवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने राजस्थानला विजयासाठी २०२ धावांचं लक्ष्य दिलं होतं. वैभव व ध्रुवच्या वादळी अर्धशतकी खेळींच्या बळावर राजस्थानने हे लक्ष्य सहज गाठलं.
आरसीबीने दिलेल्या २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल दुसऱ्या षटकात झेलबाद झाला. पण यानंतर गुवाहाटीत वैभव सूर्यवंशीचं वादळ आलं. वैभवने १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर वैभव व ध्रुव जुरेल यांनी मिळून पॉवरप्लेमध्ये ९७ धावांचा डोंगर उभारला आणि २०२ धावांचं लक्ष्य सहज केलं. वैभव सूर्यवंशी २६ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ७८ धावा करत बाद झाला. ध्रुव जुरेल व वैभव सूर्यवंशी यांनी ३७ चेंडूत १०८ धावांची कमालीची भागीदारी रचली. तर ध्रुव जुरेलने दुसऱ्या टोकाकडून अखेरच्या क्षणापर्यंत संघाचा डाव उचलून धरला.
आरसीबीकडून कृणाल पंड्याने सलग २ चेंडूत २ विकेट्स घेत संघाला सामन्यात परत आणलं, पण ध्रुव जुरेल व जडेजाच्या भागीदारीमुळे राजस्थानने विजय नोंदवला. ध्रुव जुरेल ४३ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावांची खेळी करत नाबाद परतला. तर जडेजाने २४ धावांचं योगदान देत जुरेलला चांगली साथ दिली. यासह राजस्थानने १८ षटकांत २०२ धावा करत विजय नोंदवला.
राजस्थानने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि सामन्यातील पहिल्याच चेंडूवर आर्चरने फिल सॉल्टला झेलबाद केलं. राजस्थानच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पॉवरप्लेमध्येच ३ विकेट्स घेतले. विराट कोहली १६ चेंडूत ३२ धावा करत बाद जाला. तर देवदत्त पडिक्कलही १४ धावांवर माघारी परतला. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने ४० चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. ज्यामुळे संघाचा डाव त्याने सावरला. याशिवाय रोमारियो शेफर्डने २२ धावांचं योगदान दिलं.
संघाने झटपट विकेट्स गमावल्याने वेंकटेश अय्यरला या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. वेंकटेश अय्यरने १५ चेंडूत २ षटकार व एका चौकारासह नाबाद २९ धावा करत संघाला २०१ धावांपर्यंत नेलं. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई व बृजेश शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर संदीप शर्मा व रवींद्र जडेजा यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
