Rajasthan Royals Enters Qualifier 2: राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात धडक मारली आहे. राजस्थानने सनरायझर्स हैदराबादचा ४७ धावांनी मोठा पराभव केला. राजस्थानच्या या विजयाचे हिरो ठरले वैभव सूर्यवंशी व जोफ्रा आर्चर. वैभवने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी ९७ धावांची वादळी खेळी केली. तर जोफ्रा आर्चरने ३ महत्त्वाचे विकेट्स घेत राजस्थानचा विजय निश्चित केला. यासह सनरायझर्स हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामनादेखील न्यू चंदीगढमध्ये खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध ३१ मे रोजी आयपीएल २०२६ चा अंतिम सामना खेळेल.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात खराब झाली. अभिषेक शर्मा डकवर बाद झाला. त्यानंतर हेड व इशानने संघाचा डाव सावरला. पण इशान किशन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. इशान ११ चेंडूत ३३ धावा करत बाद झाला. तर हेड १७ धावा व हेनरिक क्लासेन १८ धावा करत माघारी परतला. नितीश कुमार रेड्डी व सलिल अरोरा यांनी संघाचा डाव सावरला पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत.
नितीश रेड्डी व सलिल अरोरा यांनी ५६ धावांची भागीदरी रचली. नितीश रेड्डी ३८ धावा तर सलिल अरोरा ३५ धावा करत बाद झाले. यानंतर शिवांग कुमारने अखेरच्या षटकांमध्ये आर्चरच्या षटकात कमालीचे फटके खेळले. पण अखेरीस संघाला पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानकडून आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स तर यश राज व सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
हैदराबादने नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. राजस्थानकडून १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने तर धुमाकूळ घातला. वैभव सूर्यवंशीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत संघाच्या सर्व रणनितींवर पाणी फेरलं. वैभव व यशस्वीने पहिल्या विकेटसाठी ४८ चेंडूत १२५ धावांची भागीदारी रचली. एकट्या वैभव सूर्यवंशीने यामध्ये ९७ धावांचं योगदान दिलं.
वैभव सूर्यवंशीने या खेळीदरम्यान प्लेऑफमधील सर्वात जलद अर्धशतक १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं. यानंतर त्याला सर्वात जलद शतक झळकावण्याची संधी होती, पण ९७ धावांवर तो बाद झाला. वैभवने २९ चेंडूत ५ चौकार वन तब्बल १२ षटकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ३३४.४८ होता. याशिवाय यशस्वी जैस्वाल व रियान पराग यांनी अनुक्रमे २९ धावा व २६ धावांचं योगदान दिलं. तर ध्रुव जुरेलने २१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतकी खेळी केली. पण अखेरच्या षटकांमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत राजस्थानला फारश्या धावा करू दिल्या नाहीत. हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर इशान मलिंगा, नितीश कुमार रेड्डी व शिवांग कुमार यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
