राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ एकजुटीने खेळत असून प्रत्येक खेळाडू आपले योगदान देत आहे. काल (२७ मे) झालेल्या क्लॉलिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. सलामीवर जोस बटलरची धडाकेबाज शतकी खेळी हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. मात्र, जितके महत्त्व बटलरच्या शतकाला आहे तितकेच महत्त्व वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या प्रयत्नांनीही आहे. त्यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर आरसीबीला केवळ १५७ धावांवर गुंडाळणे शक्य झाले. विशेष म्हणजे ओबेड मॅकॉयची आई गंभीर आजारी आहे. तरीदेखील बंगळुरूविरुद्ध सामना खेळून त्याने खेळाडू असल्याचे कर्तव्य पूर्ण केले.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल क्वॉलिफायर २ सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. बंगळुरूच्या संघातील फॅफ डुप्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक या स्फोटक फलंदाजांना कमीतकमी धावसंख्येमध्ये गुंडाळण्याचे आव्हान राजस्थानच्या गोलंदाजांसमोर होते. प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय या वेगवान गोलंदाजांनी हे आव्हान उत्कृष्टपणे पेलत प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळचा वेस्ट इंडिजचा खेळाडू असलेला कौंटुबिक अडचणीत होता. त्याच्या आईची तब्येत बिघडलेली आहे. मात्र, आपल्या संघाला आपली गरज आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन तो घरी गेला नाही.

राजस्थानचा प्रशिक्षक कुमारा संगकाराने याबाबत माहिती दिली. राजस्थानने सामना जिंकल्यानंतर संगकारा म्हणाला, “ओबेड मॅकॉयने अतिशय चांगली कामगिरी केली. त्याची आई आजारी आहे. असे असतानाही मॅकॉयने सामन्यावर लक्ष केंद्रित केले.” संगकाराने प्रसिद्ध कृष्णा, कर्णधार संजू सॅमसन आणि शतकवीर जोस बटलरचीही मुक्तकंठाने स्तुती केली आहे.