RR vs CSK Highlights: रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेतील तिसरा आणि राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध पार पडला. गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. चेन्नईचा डाव १९.४ षटकात अवघ्या १२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने वेगवान अर्धशतकी खेळी केली. राजस्थान रॉयल्सने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.

राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावांची गरज होती. संघात एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज असलेल्या राजस्थान रॉयल्स संघासाठी हे आव्हान फार मोठं नव्हतं. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वालने मिळून पहिल्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने अवघ्या १५ चेंडूत दमदार अर्धशतक झळकावलं. तो १७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी करून माघारी परतला. तर ध्रुव जुरेलने १८ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने नाबाद ३८ तर रियान परागने नाबाद १४ धावांची खेळी करून राजस्थानला विजय मिळवून दिला.

चेन्नईने केल्या १२७ धावा

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सकडून नांद्रे बर्गरने आधी संजू सॅमसनला ६ धावांवर बाद केलं. तर ऋतुराज गायकवाड देखील अवघ्या ६ धावा करून माघारी परतला.

त्यानंतर फलंदाजीला आलेला आयुष म्हात्रे गोल्डन डकवर माघारी परतला. तर मॅट शॉट अवघ्या २ धावा करून माघारी परतला. सर्फराज खानने चौकार आणि षटकार मारून चांगली सुरुवात केली. पण तो १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कार्तिक शर्माने १८ धावांचे योगदान दिले. शेवटी जेमी ओव्हरटनने ४३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण चेन्नईचा संपूर्ण डाव १९.४ षटकात १२७ धावांवर आटोपला.