RR vs DC, IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना २२५ धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार रियान परागने ९० धावांची दमदार खेळी केली. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवायचा होता. कारण याआधी दिल्लीने कधीच इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. दिल्लीकडून सलामीला आलेल्या पथूम निसांका आणि केएल राहुल यांनी दमदार सुरुवात करून दिली. तर शेवटी ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्माने मिळून दिल्लीला विजय मिळवून दिला.

दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२६ धावांचा डोंगर उभारायचा होता. दिल्लीने याआधी इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. दिल्लीला चांगल्या सुरुवातीची गरज होती. ही सुरुवात सलामीला आलेल्या पथूम निसांका आणि केएल राहुल यांनी मिळून करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या. निसांकाने ३३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार खेचले. केएल राहुलने ४० चेंडूत ७५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ५ षटकार खेचले.

सलामी जोडी बाद झाल्यानंतर नितीश राणाने १७ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. शेवटी ट्रिस्टन स्टब्सने नाबाद १८ आणि आशुतोष शर्माने नाबाद २५ धावांची खेळी करून दिल्लीला ७ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्सने उभारला २२५ धावांचा डोंगर

राजस्थान रॉयल्सचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. कारण सलामीला आलेला वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रियान पराग आणि ध्रुव जुरेलने मिळून संघाचा डाव सांभाळला. जुरेलने ४२ धावांची खेळी केली. तर रियान परागने ९० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २२५ धावांपर्यंत मजल मारली.