पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्याच अभिनव शॉ याला रौप्यपदक

नवी दिल्ली : जर्मनीत सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने बुधवारी सुवर्णपदकाची कमाई केली. या गटात रौप्यपदकसुद्धा भारताच्याच अभिनव शॉ याला मिळाले.

ठाण्याचा रुद्रांक्ष आणि अभिनव या भारतीय जोडगोळीने सकाळच्या सत्रात आठ स्पर्धकांचा समावेश असलेल्या अंतिम टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी केली. मग रंगतदार झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत रुद्रांक्षने अभिनववर १७-१३ अशी मात केली.

दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या रुद्रांक्षला अभिनवने कडवी लढत दिली. पहिल्या तीन फैरींनंतर अभिनव ४-२ असा आघाडीवर होता. परंतु रुद्रांक्षने लवकरच सावरत त्याला मागे टाकले. जर्मनीच्या निल्स पॅलबर्गला कांस्यपदक मिळाले.

मंगळवारी झालेल्या पात्रता टप्प्यातही रुद्रांक्षने ६२७.५ गुण अशी सर्वोत्तम कामगिरी केली होती. अंतिम आठ स्पर्धकांमध्ये रुद्रांक्ष-अभिनवसह पार्थ मखिजाचा समावेश होता. पार्थला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारत एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांसह गुणतालिकेत अग्रस्थानावर आहे.

रमिताला रौप्य

कनिष्ठ महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात मंगळवारी पात्रता फेरीत ६३०.५ गुणांसह अव्वल स्थान मिळवणाऱ्या रमिताने अंतिम टप्प्यातही ५६१ गुणांसह सर्वोत्तम कामगिरी केली. परंतु सुर्वपदकाच्या लढतीत कनिष्ठ विश्वविजेत्या आणि टोक्यो ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणाऱ्या फ्रान्सच्या ओसीनी म्युलरकडून ८-१६ अशा पराभवामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.