scorecardresearch

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : रुद्रांक्षला सलग दुसरे पदक; पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक गटात कांस्य; चीनचे वर्चस्व

गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या ठाण्याच्या रुद्रांक्षने पुन्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली.

rudrankksh wins bronze medal
रुद्रांक्ष पाटील

भोपाळ : भारताच्या रुद्रांक्ष पाटीलने विश्वचषक स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना शुक्रवारी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. रुद्रांक्षचे स्पर्धेतील हे सलग दुसरे कांस्यपदक ठरले. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी चीनने सोनेरी यश मिळवले.

टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या चीनच्या शेंग लिहाओने पुरुष, तर जागतिक विजेत्या हुआंग युटिंगने महिला विभागात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत आतापर्यंत चीनने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आपले वर्चस्व राखले आहे. दुसऱ्या स्थानावरील भारताने तीन कांस्य आणि प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्यपदक मिळवले आहे.

गेल्या काही काळापासून जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या ठाण्याच्या रुद्रांक्षने पुन्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली. रुद्रांक्षने गुरुवारी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक गटात आर. नर्मदा नितीनसह कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर शुक्रवारी वैयक्तिक गटातही त्याने पदकाची कमाई केली. पात्रता फेरीत रुद्रांक्षने ६३१ गुणांसह चौथ स्थान मिळवले होते. त्यानंतर अव्वल आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत एक वेळ तो पदकापासून फार दूर होता. मात्र, पाच फेऱ्यांच्या चौथ्या संधीमध्ये त्याने सर्वाधिक ५३.५ गुणांचा वेध घेत स्वत:ला पदकाच्या शर्यतीत कायम राखले. चीनचे तीन नेमबाज २०व्या संधीपर्यंत पहिल्या तीन क्रमांकावर होते. पाचव्या संधीला रुद्रांक्ष चीनच्या यु हाओनानविरुद्ध ०.८ गुणांनीच मागे होते. तेव्हा रुद्रांक्षने ५२.६ गुणांचा, तर युने ५१.५ गुणांचा वेध घेतला. त्यामुळे रुद्रांक्षचे कांस्यपदक निश्चित झाले. सुवर्णपदक विजेत्या शेंगचे २६४.२, तर रौप्यपदक विजेत्या डू लिशूचे २६३.३ गुण होते. अंतिम फेरीत शेंगने १७-१३ अशी सरशी साधली. महिला विभागात भारताची रमिता ६३२.३ गुणांची कमाई करून पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आली. अंतिम फेरी गाठणाऱ्या आठ नेमबाजांत रमिता एकमेव भारतीय होती. कांस्यपदकाच्या शर्यतीत कझाकस्तानच्या अ‍ॅलेक्झांड्रा ले (२६१.२) हिने रमिताला (२६०.५) मागे टाकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 03:58 IST

संबंधित बातम्या