Virat Kohli Viral Video: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. मालिकेतील पहिला सामना एजबस्टनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर दमदार विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण डाव २५८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आणि दिलेलं आव्हान अवघ्या ४५.२ षटकांत पूर्ण केलं आणि ६ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंनी पुनरागमन केलं. दरम्यान सामना झाल्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहलीला अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकला नव्हता. आता इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याने पुनरागमन केलं आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण फलंदाजीत तो आपली छाप सोडू शकला नाही. विराट ६ चेंडूंमध्ये ५ धावा करुन जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर पायचित होऊन माघारी परतला.
विराटचा व्हिडीओ होतोय व्हायरल
दरम्यान सामना झाल्यानंतर विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात भारतीय खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात येताना दिसून येत आहेत. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आधीच मैदानात आला, पण तो पुढे न जाता तिथेच थांबला आणि कर्णधार शुबमन गिल येण्याची वाट पाहिली. विराटने त्याला, “ये ना भावा…”, असं म्हंटलं. यावर शुबमन गिल म्हणाला, “मी धावू शकत नाही.” शुबमन गिल फलंदाजी करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं होतं. संघातील वरिष्ठ खेळाडू असूनही तो कर्णधारासाठी थांबला, या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे.
भारतीय संघाचा दमदार विजय
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २५९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेला रोहित शर्मा अवघ्या ११ धावा करुन माघारी परतला. तर विराट कोहलीने ५ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने ८० धावांची खेळी केली. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने ३५ धावांचे योगदान दिले. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ आणि अक्षर पटेलने नाबाद ५७ धावांची खेळी करून भारताला हा सामना ६ गडी राखून जिंकून दिला.
