IPL 2026 CSK and Captain Ruturaj Gaikwad Fined: चेन्नई सुपर किंग्सला यंदाच्या हंगामातील अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यासह चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ८९ धावांनी स्वीकारलेला हा पराभव चेन्नईसाठी आयपीएलच्या इतिहासातील धावांच्या तुलनेत मोठा पराभव आहे. या पराभवातून संघ सावरलेला नसताना आता बीसीसीआयने कर्णधार ऋतुराज गायकवाडसह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई केली आहे. कारण काय आहे जाणून घेऊया.

गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआयने कर्णधारासह संपूर्ण चेन्नई सुपर किंग्स संघाला दंड ठोठावला आहे. सामन्यात षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि मोठा दंड ठोठावण्यात आला. या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने हा गुन्हा करण्याची ही दुसरी वेळ आहे, ज्यामुळे संपूर्ण संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

CSKच्या संपूर्ण संघाला का बसला दंड?

या आयपीएल हंगामात चेन्नई संघाला स्लो ओव्हर रेटचा दुसऱ्यांदा फटका बसला. यापूर्वी, हंगामातील १८ व्या सामन्यात, संघ निर्धारित वेळेत आवश्यक षटकं टाकण्यात अपयशी ठरला होता. आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार, जो षटकांच्या गतीशी संबंधित आहे, कर्णधार ऋतुराज गायकवाडला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केवळ कर्णधारावरच नव्हे, तर संघातील इतर सर्व खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. त्या सर्वांना ६० लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या २५% दंड ठोठावण्यात आला आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ मध्ये सपशेल अपयशी ठरली. या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी संघाला केवळ सहा सामने जिंकता आले. १२ गुण आणि -०.३४५ च्या खराब नेट रन रेटमुळे सीएसकेला यावेळी प्लेऑफमध्ये स्थान गाठता आलं नाही. सलग तिसऱ्या हंगामात चेन्नईला आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. चेन्नईने शेवटचे आयपीएल विजेतेपद २०२३ मध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. गुजरातच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. तर दुसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शन व जोस बटलर यांनी ८२ धावा केल्या. यासह टॉप-३ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत संघाला २२९ धावांचा मोठा डोंगर उभारून दिला.

प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ १३.४ षटकांत फक्त १४० धावा करत सर्वबाद झाला. या हंगामात चेन्नईला अनुभवी खेळाडू एम.एस. धोनीची सर्वाधिक उणीव भासली. दुखापतीमुळे तो या हंगामात एकही सामना खेळू शकला नाही.