Ruturaj Gaikwad Statement on CSK win Over MI: चेन्नई सुपर किंग्सने वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु चेन्नईच्या स्फोटक फलंदाजीने आणि त्यानंतर संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीने मुंबई इंडियन्सला गुडघे टेकायला भाग पाडलं. चेन्नईने मुंबईवर तब्बल १०३ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने संघाचा हा ऐतिहासिक विजय एका खेळाडूला समर्पित केला. पाहूया नेमकं काय म्हणाला?

सीएसकेने २० षटकांत २०७ धावांचा भक्कम डोंगर उभारला आणि प्रत्युत्तरात मुंबईला १९ षटकांत केवळ १०४ धावांवर गुंडाळलं. यासह, चेन्नईने १०३ धावांनी विजय मिळवला. या हंगामातील चेन्नई सुपर किंग्सचा हा तिसरा विजय आहे. मुंबईला सीएसकेविरूद्ध १०३ धावांनी पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या इतिहासातील मुंबईचा सर्वात मोठा आहे. संजू सॅमसन संघाच्या या ऐतिहासिक विजयाचा सामनावीर खेळाडू ठरला.

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर काय म्हणाला?

कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या सामन्यानंतर वक्तव्याने तर सर्वांची मनं जिंकली आहे. ऋतुराज गायकवाडला सामन्यानंतर मुकेश चौधरीबद्दल सुरूवातीला विचारण्यात आलं. तेव्हा ऋतुराज म्हणाला, “त्याच्यासाठी ही स्थिती खूप कठीण होती. मी हा विजय त्याला (मुकेश चौधरी) समर्पित करतो. अशा वेळी मैदानात येणं मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असतं. पण तो संघासाठी, फ्रँचायझीसाठी परत आला, कारण त्याला माहिती होतं की आम्हाला त्याची गरज आहे. त्याचं खूप कौतुक करायला हवं. आम्ही गोलंदाजीला उतरण्यापूर्वी देखील हेच बोललो की आजचा सामना आम्हाला मुकेशसाठी जिंकायचा आहे. आम्हा सगळ्यांना त्याच्यासाठी चांगलं खेळायचं होतं आणि प्रत्येकाने त्याला साथ दिली.”

ऋतुराजने मुकेश चौधरीला विजय का समर्पित केला?

मुकेश चौधरीच्या आईचं अवघ्या काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झालं होतं, आईच्या निधनानंतरही तो मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यासाठी संघात दाखल झाला आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसला. मुकेश चौधरीला सामन्यातील दुसरं षटक टाकण्याची संधी मिळाली. मुकेशने षटकाची कमाल सुरूवात करत सलग ४ डॉट बॉल टाकले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर क्विंटनला क्लीन बोल्ड करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यानंतर त्याने आभाळाकडे पाहत जणू आईला विकेट समर्पित करत श्रध्दांजली वाहिली.

विजयाबद्दल कसं वाटतंय बोलताना कर्णधार ऋतुराज म्हणाला, “छान वाटतंय. टॉसच्या वेळी मी संभ्रमात होतो. दोन्हीच्या बाबतीत माझं मत ५०-५० होतं. मन सांगत होतं की आधी फलंदाजी करावी, कारण पिच थोडं हिरवं होतं पण थोडं कोरडंही होतं. सुरुवातीच्या काही षटकांत परिस्थिती समजून घ्यावी लागली. मी आणि संजूने ठरवलं की चेंडू व्यवस्थित येत नाहीये, त्यामुळे सुमारे २०० धावा चांगला स्कोअर ठरेल. त्यानंतर अकील आणि नूरने चांगली गोलंदाजी केली. प्रत्येकाने आपापली भूमिका चांगली निभावली. संजूनेही शानदार खेळी केली, तो उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि आमची गोलंदाजीही मागील सामन्यांपेक्षा सुधारताना दिसतेय. मला वाटतं आम्ही आता हळूहळू योग्य लयीत येत आहोत.”