Ruturaj Gaikwad Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. चेपॉकच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जला अवघ्या १५७ धावांवर रोखलं. यादरम्यान कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकाकी झुंज देत नाबाद ७४ धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीच्या बळावर त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजीत संघर्ष करताना दिसून आला आहे. गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात जेव्हा इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. तेव्हा ऋतुराज गायकवाड शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ४९ चेंडूंचा सामना करुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर शेवटपर्यंत फलंदाजी करुन त्याने ६० चेंडूंचा सामना करुन ६ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने नाबाद ७४ धावांची खेळी केली. यासह अर्धशतकांच्या रेकॉर्डमध्ये त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये ७८ सामन्यांनंतर सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

आयपीएलमध्ये फलंदाजी करताना ७८ सामन्यांनंतर सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावे २६ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या नावे २३ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी फलंदाज ख्रिस गेलने देखील २३ अर्धशतकं झळकावली होती. तर सनरायझर्स हैदराबादचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने देखील २३ अर्धशतकं झळकावली होती.

आयपीएलमध्ये ७८ डावांनंतर सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे फलंदाज

केएल राहुल- २६ वेळेस
ऋतुराज गायकवाड- २३ वेळेस
ख्रिस गेल- २३ वेळेस
डेव्हिड वॉर्नर- २३ वेळेस

चेन्नईने केल्या १५८ धावा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. संजू सॅमसन ११, उर्विल पटेल ४, सर्फराज खान ०, डेवाल्ड ब्रेव्हिस २, शिवम दुबे २२, कार्तिक शर्मा १५ आणि जेमी ओव्हरटनने १८ धावांचे योगदान दिले. तर ऋतुराज गायकवाडने नाबाद ७४ धावांची खेळी केली.