Ruturaj Gaikwad Virat Kohli Video IND vs SA: भारतीय संघाच्या विराट कोहली व ऋतुराज गायकवाडच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली व ऋतुराज गायकवाड या दोघांनीही शतकं झळकावली. कोहली १०२ धावा तर ऋतुराजने १०५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋतुराज विराट कोहलीच्या या शॉटवर थोडक्यात वाचला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली व ऋतुराज गायकवाड या जोडीने १५६ चेंडूंत १९५ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीने भारताच्या या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेपासून वादळी फॉर्मात दिसत आहे. चौकार-षटकारांचा पाऊस पाडत विराट आक्रमक फटके खेळताना दिसला. विराटने षटकारासह त्याचं खातं उघडलं.
विराट कोहलीने त्याच्या शतकादरम्यान असा शॉट खेळला, ज्यामुळे गायकवाड जखमी होऊ शकला असता. ३४ व्या षटकात कोहली पुढे आला आणि त्याने एक स्ट्रोक खेळला, जो ऋतुराज गायकवाडच्या अगदी जवळून गेला. ऋतुराजने विराटने मारलेला चेंडू पाहून त्याने खाली पडला आणि स्वत:ला वाचवलं. विराटही ते दृश्य पाहून घाबरला व त्याच्याजवळ जाऊन विचारपूस केली. या खेळीदरम्यान विराटने अजून एक तसा शॉट खेळला होता जो अगदी ऋतुराज गायकवाडच्या डोक्यावर गेला होता.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात दुसरं शतक झळकावलं. विराटचं हे वनडेमधील ५३वं शतक ठरलं. विराट कोहलीबरोबर ऋतुराज गायकवाडनेही शतक झळकावलं. ऋतुराज गायकवाडचं हे वनडे क्रिकेटमधील त्याचं पहिलं शतक होतं. गायकवाडने विराट कोहलीच्या मदतीने ७७ चेंडूंत आपलं वादळी शतक पूर्ण केलं.
ऋतुराज गायकवाड सलामीवीर असूनही त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर ऋतुराजने दुसऱ्या सामन्यात मात्र आपलं शतक पू्र्ण केलं. ऋतुराज गायकवाडने त्याच्या विराटलाही त्याच्या शतकाचं श्रेय दिलं. विराटने शतकी खेळी करताना त्याला खूप मदत केल्याचं त्याने म्हटलं. ऋतुराजच्या शतकानंतर विराटने हात उंचावत त्याचं कौतुक केलं आणि त्याला मिठी मारत त्याच्या कानात काहीतरी बोलतानाही दिसला होता.
