आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर चेन्नईने दांडे पुनरागमन केलं आहे. लागोपाठ ३ सामने गमावल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा सामना कोलकाताविरुद्ध पार पडला. या सामन्यात चेन्नईने कोलकातासमोर विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईचे या धावांचा यशस्वी बचाव केला. यासह आयपीएल २०२६ स्पर्धेत २०० पेक्षा धावांचा यशस्वी बचाव करणारा पहिलाच संघ ठरला. या विजयानंतर ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे.

सामना झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, “खरं सांगू तर, खूप चांगलं वाटतंय. आम्ही पुन्हा एकदा धावांचा यशस्वी बचाव केला आहे. मला आधी वाटलं होतं हा पार स्कोअर आहे. ७-८ षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळपट्टीत बदल जाणवला. चेंडू फिरायला लागला आणि थोडा थांबून येऊ लागला. आधी आम्ही २१०-२२० धावांचा विचार केला होता. पण त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की, १८०-१९० धावा पुरेशा आहेत.”

या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजांचं कौतुक करताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, “प्रत्येकाला आपला रोल काय आहे, हे समजलं आहे. कोणत्या षटकात कशी गोलंदाजी करायची, कोणत्या लेंथवर गोलंदाजी करायची. संघाला जी गरज आहे, त्या गरजेनुसार ते गोलंदाजी करत आहेत. हळू हळू आम्ही आणखी चांगली कामगिरी करत आहोत. ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे.”

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेव्हिसने ४१ धावा केल्या. आयुष म्हात्रेने ३८ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ५ गडी बाद १९२ धावांवर पोहोचवली. कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रमनदीप सिंगने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर रोमन पॉवेलने नाबाद ३१ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात २८ धावांचे योगदान देऊ शकला. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ विजयापासून ३२ धावा दूर राहिला.