आयपीएल २०२६ मध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुप किंग्स संघ पुनरागमन करत आहे. आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या अनेक मुलाखतींचे, ड्रेसिंग रूममधील आणि वक्तव्यांचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यादरम्यानच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एका चिमुकलीने विचारलेल्या प्रश्नावर ऋतुराजच्या उत्तराने हशा पिकला. ऋतुराज बाऊन्सरपेक्षा त्याच्या बायकोला घाबरतो असं तो म्हणाला, पाहूया नेमकं काय म्हणतोय.
चेन्नई सुपर किंग्स संघातील काही खेळाडू व कोच लायनस प्रेस क्लब एडिशनमध्ये लहान मुलांशी संवाद साधताना दिसले. यादरम्यान कोच स्टीफन फ्लेमिंग, संघाचे सीईओ काशी विश्वनाथ, कर्णधार ऋतुराज गायकवाड, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन असे काही खेळाडू आहेत. यादरम्यान एका चिमुकलीने ऋतुराजला प्रश्न विचारला, वेगवान गोलंदाज असतात, खूप वेगाने चेंडू येतो, त्या बाऊन्सरची तुला भीती वाटते का?
चिमुकलीच्या या प्रश्नावर उत्तर देताना ऋतुराज गायकवाडने दिलेल्या उत्तराने सर्वच जण खळखळून हसले. ऋतुराज म्हणाला, “मला कदाचित २-३ वर्षांपूर्वी याची भिती वाटायची, मग माझं लग्न झालं आहे आणि आता मला माझ्या बायकोची जास्त भिती वाटते.” ऋतुराज गायकवाडने दिलेल्या या उत्तराचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ऋतुराज गायकवाडने ३ जून २०२३ मध्ये पत्नी उत्कर्षा पवार हिच्याशी लग्नगाठ बांधली. उत्कर्षादेखील क्रिकेटपटू आहे, ती महाराष्ट्रकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसली. ऋतुराज व उत्कर्षा लग्नानंतर पुण्यात राहतात.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ १० सामन्यानंतर १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. सीएसकेला प्लेऑफ गाठण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. एम एस धोनीच्या अनुपस्थितीनंतर संघाचं समीकरण हळूहळू बसताना दिसत आहे. पण चाहते अजूनही धोनी संघात कधी परतणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
एम एस धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे तो अजून या हंगामात एकही सामना खेळलेला नाही, मात्र त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. हंगामाचा अर्ध्याहून अधिक टप्पा पूर्ण झाला असून चेन्नईने १० सामने खेळले आहेत आणि त्यांची कामगिरी आतापर्यंत अपेक्षेपेक्षा कमीच राहिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून दरवर्षीप्रमाणेच यंदाही ४४ वर्षीय धोनीच्या आयपीएल भवितव्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. पण धोनी कधी खेळणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. धोनी सातत्याने सराव सत्रात सहभागी होत आहे, पण सामन्यासाठी मात्र तो संघासोबत स्टेडियममध्ये दिसून येत नाही.
