Ruturaj Gaikwad Hundred in Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाडचा वादळी फॉर्म कायम आहे. ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राचा डाव सावरत पुन्हा एकदा संघासाठी तारणहार ठरला आहे. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील सामन्यात संपूर्ण संघ फेल झालेला असतानाही त्याने एकट्याने महाराष्ट्राची धावसंख्या २०० पार नेली आहे.
ऋतुराज गायकवाडने १४ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावा करत त्याने शतक झळकावलं आहे. महाराष्ट्रचा संघ २५ बाद ५ विकेट्स अशी अवस्था असताना तो खेळण्यासाठी उतरला आणि महाराष्ट्र संघाचा डाव सावरला. ऋतुराजला विकी ओस्तवालने अर्धशतक करत चांगली साथ दिली आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्र संघाला २०० पार नेलं आहे.
ऋतुराज गायकवाडने या शतकासह लिस्ट ए क्रिकेटमधील ९ डावांमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह ऋतुराजचं हे लिस्ट एमधील २०वं शतक आहे. २० शतकांसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी साधली आहे. ऋतुराजने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ९५ डावांमध्ये २० शतकं आणि १९ अर्धशतकं केली आहेत.
ऋतुराज गायकवाडने गोवाविरूद्ध सामन्यात १३१ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १३४ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय विकी ओस्तवाल २ चौकार २ षटकारांसह ५३ धावा करत बाद झाला. तर राजवर्धन हंगरगेकर याने ३२ धावा करत ऋतुराजला चांगली साथ दिली. यासह ५० षटकांत महाराष्ट्र संघाने ७ बाद २४९ धावा केल्या आहेत.
ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमधील गेल्या ७ डावांमध्ये १०६च्या स्ट्राईक रेटने आणि ६७ सरासरीने ३३५ धावा केल्या आहेत. सातत्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ऋतुराज चमकदार कामगिरी करत आहे. ऋतुराजच्या या वादळी कामगिरीनंतरही त्याला भारताच्या वनडे संघात स्थान मिळत नाहीये. ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघात संधी मिळाली होती, ज्यामध्ये त्याने त्याचं पहिलं वनडे शतक केलं होतं. पण न्यूझीलंडविरूद्ध मालिकेसाठी त्याची संघात निवडदेखील करण्यात आलेली नाही. ऋतुराज मात्र त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने निवड समितीचे दरवाजे ठोठावताना दिसत आहे.
