Ruturaj Gaikwad Maiden ODI Hundred: ऋतुराज गायकवाडने संधीचं सोनं करत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं झळकावलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेकही दक्षिण आफ्रिका संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्माची सलामी जोडी उत्कृष्ट सुरूवातीनंतर माघारी परतले. यानंतर विराट कोहलीने ऋतुराज गायकवाडच्या जोडीने संघाचा सावरला. यादरम्यान बऱ्याच काळानंतर टीम इंडियात संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने दणदणीत शतक झळकावत भारताचा डाव सावरला.
ऋतुराज गायकवाडला मोठ्या प्रतिक्षेनंतर भारताच्या वनडे संघात खेळण्याची संधी मिळाली. ऋतुराज गायकवाड हा सलामीवीर फलंदाज असला तरी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली, पण ऋतुने संघ व्यवस्थापनाला निराश न करता उत्कृष्ट खेळी साकारली. भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने ऋतुराजला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने श्रेयसची कमी भासू न देता शानदार कामगिरी केली.
ऋतुराज गायकवाडने ७७ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण होताच ऋतुराजने हवेत उडी मारत आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केलं. यानंतर विराटच्या दिशेने चालत येताना त्याने मान खाली घालत डोक्यावर हात ठेवला आणि मग विराटला जणू लहान मुलांप्रमाणे मिठी मारली. यादरम्यान ऋतुराज गायकवाडचं शतक पाहून विराटने दोन्ही हात वर करत त्याचं कौतुक केलं. विराट दोन्ही हात वर करत ऋतुराजच्या दिशेने आला आणि त्याचा मिठी मारत त्याच्या कानात काहीतरी बोलताना दिसला. यानंतर ऋतुराजने हेल्मेट काढत बॅट उंचावली.
ऋतुराज गायकवाडने भारत अ विरूद्ध दक्षिण आफ्रिका अ वनडे मालिकेतील सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. ऋतुराजने पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट शतक झळकावत भारत अ संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यातही ऋतुराजने अर्धशतक करत संघाच्या डावात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय ऋतुराजने रणजी ट्रॉफीतही शतकी खेळी केली होती. गेल्या काही काळामध्ये ऋतुराज वादळी फॉर्मात होता, यामुळेच श्रेयस अय्यर मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने ऋतुराजची संघात निवड केली आणि त्याला खेळण्याची संधी मिळाली.
ऋतुराज पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला, पण दुसऱ्या डावात मात्र त्याने विराट कोहलीसह संघाचा डाव सावरला. ऋतुराज यानंतर ८३ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांसह १०८ धावा करत बाद झाला. यापूर्वी त्याने विराट कोहलीसह १५६ चेंडूत १९ धावांची विक्रमी भागीदारी रचली. विराट-ऋतुराजच्या शतकी खेळींमुळे टीम इंडियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत पहिला सामना जिंकल्याने १-०ने पुढे आहे. त्यामुळे दुसरा वनडे सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.

