Ruturaj Gaikwad Takes Blame of RCB Defeat: आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने पराभवाची हॅटट्रिक केली आहे. ५ एप्रिलला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध सीएसकेला ४३ धावांनी पराभव पत्करावा लागला. २५१ धावांचं डोंगराएवढं मोठं लक्ष्य गाठण्यात चेन्नईचा संघ अपयशी ठरला. सलग तीन पराभवांमुळे सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड खूप निराश झाला होता, पाहूया नेमकं काय म्हणाला?
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २५० धावांचा डोंगर उभारला. आरसीबीच्या टॉप-५ फलंदाजांनी यामध्ये सर्वात मोठं योगदान दिलं. तर अखेरच्या षटकांमध्ये टीम डेव्हिडने २५ चेंडूत ७० धावांचं योगदान दिलं. तर प्रत्युतरात चेन्नईच्या संघाने सुरूवात चांगली केली, पण सर्व फलंदाजांनी ठराविक अंतराने सातत्याने विकेट गमावल्या. परिणामी सीएसकेचा संघ १९.४ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाला आणि आरसीबीने ४३ धावांनी सामना जिंकला.
सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान, ऋतुराज गायकवाडने सीएसकेच्या फलंदाजीच्या अपयशावर भाष्य केलं. त्याने पराभवासाठी स्वतःला जबाबदार धरलं आणि सांगितले की, जर त्याने जबाबदारी घेऊन फलंदाजी केली असती, तर २५१ धावांचं लक्ष्य गाठता आलं असतं. ऋतुराज एक षटकार लगावत अवघ्या ७ धावांवर बाद झाला.
ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
ऋतुराज म्हणाला, “जर मी थोडं अधिक योगदान दिलं असतं, तर निकाल कदाचित वेगळा असता. हे माझ्या चुकीमुळे घडलं. आम्ही २०० धावांचा टप्पा ओलांडला याचं मला आश्चर्य वाटतं. सर्फराझ, प्रशांत, जेमी आणि शिवम दुबे यांनी उत्कृष्ट प्रयत्न केले. जर मी सुरुवातीला अधिक चांगला खेळलो असतो, तर आम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकलो असतो.”
सुरूवातीपासून सामना सीएसकेच्या नियंत्रणात होता. १५ षटकांत आरसीबीची धावसंख्या ३ गडी बाद १५१ होती. त्यानंतर टीम डेव्हिड आणि रजत पाटीदार यांनी ३१ चेंडूंमध्ये ९९ धावा जोडल्या. १८ व्या षटकात अंशुल कंबोजने डेव्हिडला बोल्ड केलं, पण दुर्देवाने तो नो-बॉल ठरला. आरसीबीने संधी साधली आणि २५१ धावांचा डोंगर उभा केला.
सीएसकेचा कर्णधार अंशुल कंबोजच्या त्या चेंडूबाबत बोलताना म्हणाला, “अंशुल कंबोजने त्याला बाद केलं. तो नो-बॉल ठरला आणि त्यानंतर डेव्हिडने फटकेबाजी सुरू केली,याचं श्रेय डेव्हिडला जालं. १३व्या किंवा १४व्या षटकापर्यंत सामना आमच्या नियंत्रणात होता, पण त्यानंतर सर्व काही बदललं.”
