CSK New Head Coach Search Ruturaj Gaikwad Stephen Fleming IPL 2026 Update: चेन्नई सुपर किंग्स संघ आता नव्या कोचच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षाच्या स्पर्धेत उतरणार आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी आयपीएल २०२६ नंतर सीएसकेमधील आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. फ्लेमिंग यांनी तब्बल दशकभर संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर पद सोडलं आहे. यानंतर आता चेन्नईचे नवे कोच कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता असताना संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने महत्त्वाची माहिती दिली आहे.
फ्लेमिंग यांनी २००८च्या पहिल्या आयपीएल हंगामात CSKकडून खेळाडू म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर २००९मध्ये त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. पुढील १७ वर्षांत फ्लेमिंग आणि CSK यांच्यातील भागीदारीने फ्रँचायझी क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण संघरचनेपैकी एक उभी केली. CSKच्या यशात फ्लेमिंग यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
जुलैमध्ये CSK आणि फ्लेमिंग यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि दीर्घकाळ टिकलेल्या पार्टनरशिपच्या एका पर्वाचा अंत झाला. आता फ्लेमिंग यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची, याचा निर्णय CSK विचारपूर्वक आणि वेळ घेऊन घेणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार ऋतुराज गायकवाडने संकेत दिले आहेत की, स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची फ्रँचायझीला घाई नाही. गायकवाडने स्पष्ट केलं की फ्लेमिंग यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत फ्रँचायझीने चर्चा सुरू केली आहे, मात्र पुढील आयपीएल हंगामाला अजून बराच वेळ असल्याने सध्या निर्णय घेण्याची घाई संघात करत नाही.
नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी घाई नाही: ऋतुराज गायकवाड
पत्रकारांशी बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, “आमच्याकडे मुख्य प्रशिक्षक असेलच. व्यवस्थापन याबाबत नक्कीच विचार करत आहे. आयपीएलला अजून बराच वेळ आहे, त्यामुळे निर्णय घेण्याची कोणतीही घाई नाही.” दरम्यान, CSKच्या कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळताना आपण अजिबात अस्वस्थ नसल्याचं गायकवाडने स्पष्ट केलं. जोपर्यंत हे आव्हान पेलणं आवडत राहील, तोपर्यंत कर्णधाराची भूमिका कायम ठेवण्यास आपण तयार असल्याचं त्याने सांगितलं.
ऋतुराज म्हणाला, “एमएस धोनीकडून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणं ही मोठी गोष्ट आहे. त्याने मिळवलेल्या अफाट यशामुळे ही जबाबदारी आणखी मोठी होते आणि साहजिकच आणखी विजय आणि जेतेपदांच्या अपेक्षाही असतात. पण हा या भूमिकेचा एक भाग आहे. जोपर्यंत मला हे आव्हान आवडत आहे, तोपर्यंत मी ही भूमिका आनंदाने पार पाडेन.”
CSKच्या चाहत्यांबद्दल बोलताना गायकवाड म्हणाला, “CSKचा चाहता आणि फ्रँचायझीचा भाग म्हणून आपण अविश्वसनीय प्रवास केला आहे. २००८ पासून जवळपास प्रत्येक चक्रात आमच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे आणि इतकं सातत्य फार कमी फ्रँचायझींना राखता आलं आहे. आमचे चाहते अनेक चांगल्या क्षणांमध्ये आमच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहेत. आता कठीण काळातही त्यांनी आमची साथ कायम ठेवणं गरजेचं आहे.”
