Ruturaj Gaikwad Statement on CSK IPL 2026 Performance: चेन्नई सुपर किंग्स संघाला गुजरात टायटन्सविरूद्ध ८९ धावांनी सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. हा चेन्नईचा अखेरचा गट सामना होता. पण अखेरच्या सामन्यात संघाला स्पर्धेतील मोठ पराभव पत्करावा लागला. संघाने चांगली फलंदाजी केली पण गुजरातच्या गोलंदाजीसमोर चेन्नईच्या संघाने झटपट विकेट्स गमावल्या.
चेन्नई सुपर किंग्सला स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या दुखापतींचा मोठा फटका बसला. अनुभवी माजी कर्णधार एम एस धोनीच्या रूपात संघाला सर्वात मोठा धक्का बसला. धोनी दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकला नाही, तर सुरूवातीला डेवाल्ड ब्रेविसला दुखापत झाली होती, पण नंतर तो संघात परतला. यानंतर नॅथन एलिस, रामकृष्ण घोष, खलील अहमद, जेमी ओव्हरटन हे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले. ज्यामुळे सातत्याने संघात मोठे बदल करावे लागले होते. याचाही संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. या स्पर्धेतील खराब कामगिरीमागचं कारण कर्णधार ऋतुराज गायकवाडने सामन्यानंतर सांगितलं.
ऋतुराज गायकवाड गुजरातविरूद्ध पराभवानंतर म्हणाला, “समोर कितीही धावसंख्या असली तरी ती शक्य तितक्या लवकर गाठायची, हा आमचा विचार होता. २३० धावांचा पाठलाग त्या गोलंदाजी आक्रमणासमोर सोपा नव्हता. पण आम्ही स्वतःला मोकळेपणाने खेळू द्यावं आणि प्रयत्न करून पाहावा, असं ठरवलं होतं. त्यासाठी प्रतिस्पर्धी संघालाही श्रेय द्यावं लागेल. सुरुवातीला विकेट थोडी स्पॉन्जी होती आणि त्यांनी पॉवरप्लेमध्ये खूप चांगली सुरुवात केली. आमची गोलंदाजी पॉवरप्लेमध्ये प्रभावी ठरली नाही. त्यांच्या सलामीवीरांना रोखणं खूप कठीण गेलं. त्यांना २००च्या आत रोखण्याची संधी आमच्याकडे होती, पण आम्ही त्यात अपयशी ठरलो.”
संपूर्ण हंगामातील कामगिरीबद्दल बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, “हंगाम खूप कठीण गेला. सुरुवातीलाच सलग तीन पराभव झाले. त्यानंतर आम्ही लय मिळवली, योग्य कॉम्बिनेशन सापडलं, पण मग दुखापतींचा फटका बसला. घोष आणि ओव्हर्टन बाहेर गेल्यानंतर संघाचा समतोल बिघडला. शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आम्ही एक फलंदाज किंवा गोलंदाज कमी असल्यासारखे खेळलो.”
ऋतुराज गायकवाडने सांगितलं चेन्नईच्या आयपीएल २०२६ मधील खराब कामगिरीमागचं कारण
“अनेकांना हे मान्य नाहीये की आम्ही संक्रमणाच्या टप्प्यातील युवा संघ आहोत. आमच्या ८-१० खेळाडूंनी २० पेक्षाही कमी सामने खेळले आहेत. पण त्यांना या हंगामात मोठा अनुभव मिळाला आणि संघ म्हणून कोणत्या क्षेत्रात सुधारणा हवी, हे आम्हाला समजलं. तरीही आम्ही सहा सामने बाहेरच्या मैदानावर जिंकले, याचा संघ म्हणून अभिमान आहे. हैदराबादमध्ये १० षटकांत ८० धावा करता आल्या नाहीत आणि चेन्नईमध्ये प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात अपयश आलं. त्या गोष्टींची खंत नक्कीच आहे, पण तरीही संघाचा अभिमान वाटतो,” असं कर्णधार म्हणाला.
“अजिंक्य रहाणे अंबाती रायडू यांसारख्या अनुभवी खेळाडूंनंतर पुढे जाणं सोपं नव्हतं. मात्र, डेवाल्ड ब्रेविस, कार्तिक आणि उर्विलसारखे खेळाडू आता संघात आहेत. कार्तिकमध्ये खूप क्षमता आहे, पण त्याला अजून काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल. उर्विल पहिल्यांदाच पूर्ण हंगाम खेळतोय आणि त्यासोबत अपेक्षांचं ओझंही येतं,” असं ऋतुराज अखेरीस म्हणाला.
