देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस
IND vs AFG ODI Series India Squad Updates: भारतीय संघ आयपीएल २०२६ नंतर आता अफगाणिस्तानविरूद्ध मालिकांसाठी सज्ज होत आहे. सुरूवातीला टीम इंडिया कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर संघ वनडे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. पण या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला विराट कोहलीच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. आधी रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळणार की नाही हे निश्चित नसताला विराट कोहली दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. आता त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, हे समोर आलं आहे.
विराट कोहली याच्या दुखापतीमुळे आगामी अफगाणिस्तानविरूद्ध मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मालिकेबाहेर होणार आहे, आयपीएलदरम्यान त्याला दुखापत झाली होती. आता विराटच्या जागी ऋतुराज गायकवाड याची वनडे संघात निवड होण्याची दाट शक्यता असून, रजत पाटीदार याला भारत ‘अ’ संघात संधी मिळू शकते.
अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका १४ जूनपासून धरमशाला येथे सुरू होत आहे. मात्र, आयपीएल अंतिम सामन्यादरम्यान कोहलीला हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याने त्याला किमान दोन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठ निवड समितीला अखेरच्या क्षणी संघात बदल करावे लागणार आहेत. यापूर्वी रियान परागला दुखापत झाल्यानंतर गायकवाडला भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र आता कोहलीच्या अनुपस्थितीत त्याची थेट भारतीय वनडे संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात फलंदाजी करताना कोहलीला हॅमस्ट्रिंगमध्ये त्रास जाणवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याने फलंदाजी सुरू ठेवली असली, तरी सामन्यानंतरच्या तपासणीत दुखापत स्पष्ट झाली.
२० जून रोजी होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता असली, तरी केवळ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला घाईने संघात समाविष्ट करण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे, जुलैमध्ये भारताचा इंग्लंड दौरा होणार असून त्यात तीन वनडेंसह व्यग्र वनडे मालिकांचं वेळापत्रक असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन कोहलीच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करणार नाही.
रोहित शर्माबाबतही मीटिंगमध्ये होणार मोठा निर्णय
विराट कोहली व्यतिरिक्त, शनिवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारताच्या यूके दौऱ्यासाठीच्या टी-२० संघासह एशियन गेम्स २०२६ स्पर्धेसाठीचा संघ निवडताना रोहितच्या फिटनेसवर चर्चा होणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहितला यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे बरेच सामने खेळू शकलेला नाही. तरीही त्याचा समावेश अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात करण्यात आला आहे. मात्र अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं होतं की, रोहितची निवड त्याच्या फिटनेस चाचणीच्या निकालावर अवलंबून असेल.
सध्या तरी रोहितने फिटनेस चाचणी दिल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच तो अद्याप बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही दाखल झालेला नाही. जर रोहित फिटनेस चाचणीत अपयशी ठरला, तर निवड समिती यशस्वी जैस्वालला पुन्हा संधी देऊ शकते. मागील दोन मालिकांमध्ये तो तिसऱ्या पसंतीचा सलामीवीर होता. त्याने खेळलेल्या अखेरच्या वनडेत शतक झळकावलं होतं. तरीही अफगाणिस्तान मालिकेसाठी निवडकर्त्यांनी ईशान किशन याची राखीव सलामीवीर म्हणून निवड केली होती.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याप्रमाणेच हार्दिक पंड्या याच्या फिटनेसबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या आयपीएलदरम्यान पाठीच्या जुन्या दुखापतीमुळे त्याला काही सामने गमवावे लागले होते. आयपीएलनंतर हार्दिकने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजेरी लावली असून, त्याच्या फिटनेसवर सध्या बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. रोहितप्रमाणेच हार्दिकलाही फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे.
