scorecardresearch

“१२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या ऋतुराजची अनेकांनी उडवली खिल्ली, पण…”, आई-वडिलांनी व्यक्त केली भावना

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ऋतुराज गायकवाडने केलेली कामगिरी पाहून वडील दशरथ आणि आई सविता गायकवाड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

“१२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या ऋतुराजची अनेकांनी उडवली खिल्ली, पण…”, आई-वडिलांनी व्यक्त केली भावना
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याने एका ओव्हरमध्ये सात षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यानंतर सर्वच स्तरातून ऋतुराज गायकवाडचे कौतुक होताना पाहायला मिळते आहे. ऋतुराजचे शिक्षण हे केवळ १२ वी इयत्तेपर्यंत झाले असून क्रिकेटमध्येच त्याने स्वतः ला झोकून दिले आणि तेच आपले करिअर मानले असे ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड ह्यांनी सांगितले. ऋतुराज अवघ्या तीन वर्षांचा होता तेव्हा त्याला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून प्लास्टिकची बॅट भेट दिली होती. त्यावरील पकड आणि खेळण्याचा प्रयत्न पाहून वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले असे दशरथ गायकवाड ह्यांनी सांगितले.  

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ऋतुराज गायकवाडने केलेली कामगिरी पाहून वडील दशरथ आणि आई सविता गायकवाड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ऋतुराजच्या आई वडिलांनी ऋतुराज कडून कधीच कुठली अपेक्षा केली नाही. चांगला खेळ असे म्हणून त्याच्यावर कधीच दबाव आणला नाही. हे सर्व कर्तृत्व, कामगिरी त्याचे क्रिकेट प्रशिक्षक ह्यांचे आहे. ऋतुराजने खूप मेहनत घेत हा पल्ला गाठला आहे असे आई आणि वडिलांनी आवर्जून सांगितले. ऋतुराज १ ली ते ७ वी सेंट जोसेफ, खडकी तसेच ८ वी ते १० वी नांदगुडे हायस्कूल, पिंपळे निळख आणि ११ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ, डेक्कन पुणे येथे घेतले आहे. ऋतुराजला शिक्षणाची आवड होती पण क्रिकेटची जास्त ओढ असल्याने त्याला खेळाकडे लक्ष देण्यास त्याच्या आई वडिलांनी सांगितले . शिक्षणापासून तो दूर राहिल्याने अनेकांनी त्याची खिल्ली देखील उडवली होती.

हेही वाचा: ६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ

आमच्या काळात सचिन तेंडुलकरच सर्वोत्तम क्रिकेटर होते

तुमचा आवडता क्रिकेटर कुठला यावर उत्तर देताना ऋतुराजचे वडील म्हणाले की, आमच्या काळात सचिन तेंडुलकर हे नाव खूप मोठे होते. त्यांची खेळण्याची पद्धत खूप चांगली होती. सचिन तेंडुलकर ह्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेट ऋतुराजने खेळावे असे ऋतुराजला सूचित केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 15:00 IST

संबंधित बातम्या