Ryan Rickelton Record For Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टडियममध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकताच हार्दिक पंड्याने फलंदाजीची निवड करत चकित करणारा निर्णय घेतला. वानखेडेचं मैदान हे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओळखलं जातं. पण हार्दिकने घेतलेल्या निर्णय मात्र संघाच्या पथ्यावर पडला आहे. मुंबईने २० षटकांत ५ बाद २४३ धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांमध्ये सर्वात मोठं योगदान रायन रिकल्टनचं आहे. त्याने या शतकी खेळीसह मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
मुंबई इंडियन्सला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सलामीवीर रायन रिकेल्टनने फलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात १२३ धावांची शानदार शतकी खेळी केली, ज्यामुळे तो आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवण्यातही यशस्वी झाला. रायन रिकल्टनला गेल्या २ सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं, पण डीकॉकच्या दुखापतीमुळे तो संघात परतला आणि त्याने दमदार पुनरागमन केलं.
रायन रिकल्टनची मुंबई इंडियन्ससाठी ऐतिहासिक खेळी
रिकल्टनला पुनरागमनाची संधी मिळताच त्याने विल जॅक्ससोबत मिळून संघाला एक मजबूत सुरुवात करून दिली आणि त्यानंतर, जॅक्स बाद झाल्यावर, वेगाने धावा करत डाव सावरला. रिकल्टनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या ४४ चेंडूंमध्ये आपलं पहिलं आयपीएल शतक पूर्ण केलं. यासह, मुंबई इंडियन्ससाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर होता, ज्याने २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ४५ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं होतं.
रायन रिकल्टनने या सामन्यात ५५ चेंडूत १० चौकार व ८ षटकारांच्या मदतीने २२३ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १२३ धावांची खेळी केली. यासह आता आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी खेळी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. रायन रिकल्टनपूर्वी सनथ जयसूर्याने मुंबईसाठी ११४ धावांची खेळी केली होती. जयसूर्याचा १९ वर्षांचा विक्रम मोडत रिकल्टन पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
रायन रिकल्टनच्या शतकामुळे, मुंबई इंडियन्स आता सनरायझर्स हैदराबादनंतर आयपीएलमधील असा दुसरा संघ ठरला आहे, ज्याच्या तीन किंवा अधिक वेगवेगळ्या फलंदाजांनी एकाच हंगामात शतकं झळकावली आहेत. यापूर्वी २०२५ च्या आयपीएल हंगामात, सनरायझर्स हैदराबादसाठी अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकं झळकावली होती. तर, रिकल्टनच्या आधी, या हंगामात मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डी कॉक आणि तिलक वर्मा यांनी शतकं झळकावली होती.
