Ryan Rickelton Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४४ वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मुंबईला २० षटकांअखेर ७ गडी बाद १५९ धावा करता आल्या. यादरम्यान सलामीला आलेल्या रायन रिकल्टनने ३७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या सामन्यातही रायन रिकल्टन आणि विल जॅक्स या जोडीने डावाची सुरूवात केली. या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. विल जॅक्स १ धाव करून माघारी परतला. त्यानंतर रायन रिकल्टन आणि नमन धीर या जोडीने मिळून दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी केली.

रायन रिकल्टनचा रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रायन रिक्लटनने सलामीला फलंदाजी करताना पावरप्लेमध्ये ५ षटकार खेचले. यासह तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी पावरप्लेमध्ये संयुक्तरित्या सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने रोहित शर्माच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रोहित शर्माच्या नावे देखील पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना ५ षटकार खेचण्याची नोंद आहे. या यादीत सनथ जयसूर्या अव्वल स्थानी आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना पावरप्लेमध्ये ७ षटकार खेचले होते. रायन रिकल्टनने या डावात फलंदाजी करताना २४ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची सुरुवात केली.

मुंबईने केल्या १५९ धावा

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेला विल जॅक्स १ धाव करुन माघारी परतला. त्यानंतर रायन रिकल्टनने ३७ धावांची खेळी केली. तर नमन धीरने अर्धशतक झळकावत ५७ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने २१ धावांचे योगदान दिले. तर तिलक वर्माने ५, हार्दिक पंड्याने १८ धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सने ७ गडी बाद १५९ धावा केल्या.