MI vs SRH IPL 2026 Live Match Updates: रायन रिकल्टनने सलामीला उतरत वादळी शतक झळकावलं आहे. विजयासाठी धडपडत असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हे शतक महत्त्वपूर्ण ठरलं आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात वानखेडेच्या मैदानावर सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक मुंबईने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मुंबईच्या पथ्यावर पडला. या सामन्यासाठी मुंबईच्या ताफ्यात तीन मोठे बदल करण्यात आले. रायन रिकल्टन, विल जॅक्स ही सलामी जोडी आज निवडण्यात आली. तर रोहित शर्मा फिट नसल्याने प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला नाही. तर खालच्या फळीत रॉबिन मिन्जला संधी देण्यात आली आहे.
रायन रिकल्टन व विल जॅक्स यांनी संघाला शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पॉवरप्लेमध्येच संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पॉवरप्लेमध्ये ७८ धावा केल्यानंतर रिकल्टन व विल जॅक्सच्या जोडीने ९३ धावांची भागीदारी रचली. रायन रिकल्टनने २३ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं आणि संघाचा डाव सावरत शतकी खेळी केली.
रायन रिकल्टनने यानंतर अवघ्या ४४ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. रिकल्टनने ७ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने हे ऐतिहासिक शतक झळकावलं. रिकल्टन ४४ चेंडूत शतक झळकावताच मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रायन रिकल्टनचं आयपीएल इतिहासातील हे पहिलं शतक आहे. सलग दोन पराभवांनंतर, दुखापतीमुळे क्विंटन डी कॉक बाहेर झाल्याने, रायन रिकल्टन या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला. रिकल्टनने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि हे वादळी शतक झळकावून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली.
मुंबई इंडियन्ससाठी वेगवान शतकं करणारे फलंदाज (चेंडूंच्या आधारे)
४४ चेंडू – रायन रिकेल्टन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे, २०२६
४५ चेंडू – सनथ जयसूर्या विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे, २००८
४५ चेंडू – तिलक वर्मा विरुद्ध गुजरात टायटन्स, अहमदाबाद, २०२६
४७ चेंडू – कॅमेरून ग्रीन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे, २०२३
४९ चेंडू – सूर्यकुमार यादव विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे, २०२३
