Team India Coaching Staff: भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर संघ व्यवस्थापनात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं असून, आता सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफबद्दल अनेक चर्चा समोर आल्या होत्या. कोचिंग स्टाफमधील एक कोच भारतीय संघाची साथ सोडत आयपीएल संघाचा भाग होणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर भारताचे फिल्डिंग कोच टी. दिलीप यांना पदावरून काढून टाकण्यात येईल असा रिपोर्टही समोर आला होता. पण आता संघाचे सहाय्यक कोच पद सोडण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, नेदरलँड्सचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्या भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक असलेला रायन टेन डेश्काटे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, रायनने पद सोडण्याची इच्छा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवली आहे. मात्र, त्याच्या निर्णयाला बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची मंजुरी मिळणं आवश्यक आहे.

रायनच्या निर्णयाला मंजुरी मिळाल्यास, १९ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना हा भारतीय संघासोबतचा शेवटचा सामना ठरू शकतो. विशेष म्हणजे, रायनचा हा निर्णय पदाविषयी नाराजीमुळे नसून वैयक्तिक कारणांमुळे असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याची संभाव्य एक्झिट दोन्ही बाजूंच्या परस्पर संमतीने होण्याची शक्यता आहे.

रायन टेन डेश्काटे २०२४ मध्ये गौतम गंभीर यांनी भारतीय संघाची धुरा स्वीकारल्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये दाखल झाला होता. बीसीसीआयसोबतचा त्याचा सुरुवातीचा दोन वर्षांचा करार नुकताच संपल्याचं समजत असून, त्याची मुदत १२ ते १४ जुलैदरम्यान पूर्ण झाली आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना, लॉर्ड्सवरील मालिकेतील अखेरच्या वनडेनंतर तो पद सोडण्याच्या विचारात असल्याचं वृत्त आहे.

रायन टेन डेश्काटे यांच्या पद सोडण्याच्या निर्णयामागचं कारण काय?

रायनच्या या निर्णयामागे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. लंडनमध्ये राहणारे त्याचे तीन लहान मुलगे आणि पत्नीच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदामुळे सततचे परदेश दौरे आणि व्यस्त वेळापत्रक सांभाळावं लागत असल्याने, घरापासून कमी काळ दूर राहावं लागेल अशी अधिक स्थिर भूमिका स्वीकारण्याची त्याची इच्छा आहे.

विशेष म्हणजे, रायन टेन डेश्काटे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात अत्यंत चांगले संबंध आहेत. गंभीर यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या रायनच्या योगदानाचं कौतुक केलं आहे. भारतीय संघात त्याची नियुक्ती करण्याची शिफारसही गंभीर यांनीच केली होती. यापूर्वी दोघांनी आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघात एकत्र काम केलं होतं.