Indian Players Name In Asian Games Scorecard: भारतीय क्रिकेट संघ सध्या जपानमध्ये आहे. आयची – नागोयामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. या सामन्यादरम्यान स्कोअरकार्डवर भारतीय खेळाडूंची नावं S Vishwanadh आणि TTV Namboori अशी लिहिण्यात आली होती. यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

भारत – श्रीलंका सामन्यादरम्यान ज्यावेळी स्कोअरकार्डवर भारतीय खेळाडूंची नावं दिसली, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना वेगळंच चित्र दिसलं. प्लेईंग ११ मध्ये S Vishwanadh आणि TTV Namboori हे खेळाडू आहेत तरी कोण? असे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यामागचं कारण असं की, आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंच्या त्याच नावाचा उल्लेख केला जातो, जे नाव त्यांच्या पासपोर्टवर लिहिलेलं असतं.

S Vishwanadh आणि TTV Namboori आहेतरी कोण?

प्लेइंग ११ मध्ये S Vishwanadh हे नाव संजू सॅमसनचं आहे. संजू सॅमसनचं पूर्ण नाव S vishwanadh samson असं आहे. तर TTV Namboori हा भारताचा स्टार युवा फलंदाज तिलक वर्मा आहे. पासपोर्टवर तिलक वर्माचं नाव TTV Namboori असं आहे. त्यामुळे स्कोअरकार्डवर त्याचं नाव TTV Namboori असं लिहिण्यात आलं.

भारतीय संघाचा एकतर्फी विजय

सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. या सामन्यातही असच काहीसं चित्र पाहायला मिळालं. सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकात ७ गडी बाद १६९ धावा केल्या. भारतीय संघाकडून इशान किशनने नाबाद ८० धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या ४५ धावांवर आटोपला.